पुढच्या वर्षी लौकर या !.....

श्री ! ......................पुढच्या वर्षी लौकर या !.............................येणार येणार म्हणता बाप्पा आले , आले आले म्हणता म्हणता बसले आणि आता निघाले सुद्धा . ऋतू चक्रा प्रमाणे बाप्पाचं हे येणं जाण सुरूच असतं . बाप्पा येताना आनंद घेऊन येतात आणि जाताना विरह वेदना देऊन जातात . कदाचित बाप्पांना यातून सांगायचं असावं कि आपणा सर्वांनाच एक दिवस येथून जायचं आहे . म्हणून येण्याचा आनंद आहे तो पर्यंतच जाण्यात मजा आहे . आनंदात नाचत यायचे आनंदाने जगायचे आणि एक दिवस विसर्जित व्हायचे . तेही उंदीर मामांच्या म्हणजे आत्म्याच्या साक्षीने . काहीही असो पण बाप्पा जातात तेंव्हा खूपच वाईट वाटतं . त्यांची स्थापना केलेल्या खोलीत विसर्जनानातर पाऊल टाकू वाटत नाही . आता समज आल्याने विसर्जनाच हे दुःख थोडं कमी झालय पण लहानपणी डोळे भरून यायचे ........................१० ते २० वर्षात गणेशोत्सवाचे स्वरूप पूर्णपणे बदलले . विसर्जन मिरवणूकी चेही तेच झाले . पंढरपुरात तेंव्हा केवळ अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुका निघायच्या . सायंकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत त्या संपून जायच्या , मात्र आता अनंत चतुर्दशीच्या आधल्या दिवशी १० ते १५ मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होते . 

अनंत चतुर्दशीला दुपारी ३ ते मध्य रात्र उलटली तरी विसर्जन सोहळा सुरु असतो . शिवाय काही मंडळांचे त्या नंतरच्याही दिवशी विसर्जन होते . ..........................................आमच्या घरा समोरच असणाऱ्या लोकमान्य विद्यालयाच्या गणपतीची विसर्जन मिरवणुक खूपच आलिशान देखणी असायची . सकाळ पासून शाळेत याची तयारी सुरु असायची . दुपारपासून विद्यार्थी शाळेत जमायला सुरुवात व्हायची . त्यांचे घोडेस्वार पहिल्यांदा शाळे बाहेर यायचे त्यानंतर शाळेचे लेझीम पथक ,मग एन सी सी चे पथक , मग इतर विद्यार्थी , त्यानंतर मल्लखांब खेळणारे विद्यार्थी , त्या नंतर विद्यार्थी आणि सरांनी मिळून केलेला सजीव देखावा आणि शेवटी शाळेचा गणपती . वां .काय थाट माट असायचा लोकमान्य विद्यालयाच्या गणपतीचा !.....मनात विचार यायचा कि आपण या शाळेत शिकायला का नाही ? लोकमान्य विद्यालयाची ती मिरवणूक बघून आम्ही नाथ चौकात यायचो कारण या चौकातूनच प्रत्येक मंडळाला नदीकडे जावे लागायचे . त्यावेळी आणि अजूनही हा पंढरपुरातला मुख्य चौक मानला जातो . प्रत्येक मंडळ या चौकात आपापले लेझीम , देखावे किंवा इतर कला प्रकार सादर करायचे . .....................नाथ चौकात त्यावेळी य्न्कंची यांचा फोटो स्टुडीओ होता त्या स्टुडीओच्या ग्यालरीतून आम्ही या विसर्जन मिरवणुका बघायचो .ही ग्यालरी खूपच जुनी झाल्याने भीत भीतच सगळे उभे राहायचे . तेंव्हा ढोल पथक जवळ जवळ नव्हतेच . ग्रामीण भागातल्या लेझीम संघांना चांगली मागणी असायची . डॉल्बी हा प्रकार नव्हता . काही ना काही देखावे मात्र प्रत्येक मंडळाच्या समोर असायचे . पंढरपूरच्या घडशी मंडळीचे ब्यांड पथक बर्याच गणपतींसमोर असायचे . तेंव्हा फारश्या उंच , मोठ्या मूर्ती नसायच्या पण ज्या काही थोड्या असायच्या त्यांची लाईट च्या तारांमधून सुटका करताना मंडळाच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडायची . डोळ्यांवरची झोप वाढत चालल्यावर आम्ही घरी परतायचो . ...................................दुसर्या दिवशी पंढरपुरात जिकडे तिकडे कालच्या विसर्जन मिरवणुकीची चर्चा सुरु असायची आणि रेडिओवर मुंबईच्या विसर्जन मिरवणुकीची , .................................................श्याम सावजी ...........पंढरपूर

Post a Comment

0 Comments