पवारांच्या माघारीनंतर माढ्यातील राजकीय हालचालींना वेग... माढ्याच्या जागेवरून राष्ट्रवादीसह भाजपामध्येही संभ्रमावस्था कायम - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 14 March 2019

पवारांच्या माघारीनंतर माढ्यातील राजकीय हालचालींना वेग... माढ्याच्या जागेवरून राष्ट्रवादीसह भाजपामध्येही संभ्रमावस्था कायम

Pandharpur LIVE 14 March 2019


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याने माढ्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. माढामधून उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीचेच रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली, तर भाजप पुरस्कृत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
संजयमामांनी आपण करमाळा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगत लोकसभेची तयारी केली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी माढ्यातून भाजपकडून लढण्यास मुख्यमंत्र्यांना नकार कळविल्याचे समोर येत आहे. याचदरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपकडून उमेदवारी दिल्यास शिंदे यांची भूमिका काय असेल याची चाचपणी मुख्यमंत्र्यांनी केल्याचे कळते. मात्र, संजयमामा यांनी सावध भूमिका घेत अधिक भाष्य करण्याचे टाळल्याची माहिती आहे.
माढ्यातून पवारांनी माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीत सध्या तरी शांतता आहे. यापूर्वीचे इच्छुक प्रभाकर देशमुख यांनी शांत राहणे पसंत आहे. देशमुख हे अजित पवारांचे उमेदवार आहेत अशी चर्चा मध्यंतरी होती. पवारांनी विद्यमान खासदार विजयदादांना तुम्ही पुन्हा लढा असे सांगितले आहे. मात्र, आता मला नको, मुलगा रणजितला उमेदवारी द्या असे सुचवले आहे. मात्र, रणजितसिंहांना राष्ट्रवादी पक्षातून मोठा विरोध होताना दिसत आहे.

माढ्यातील शिंदे बंधूंसह करमाळ्याच्या रश्मी बागल, सांगोल्याचे दिपक साळुंखे, माणचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे रणजित निंबाळकर यांचा विरोध आहे. रामराजे यांनी आपली भूमिका अद्याप उघड केली नाही. असे असताना राष्ट्रवादी रणजितसिंह यांना उमेदवारी देऊन धोका पत्करेल का हा प्रश्न आहे. मात्र, रणजितसिंहांनी भाजपचे दार ठोठावल्याने राष्ट्रवादी सावध झाली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीतील एक मोठा गट मोहिते- पाटील घराणे भाजपमध्ये केव्हा जाते याची वाट आहे. सुजय विखे भाजपमध्ये गेल्याने बाळासाहेब थोरात गट जसा सुखावला आहे तसेच काहीसे चित्र माढ्यात मोहितेंच्याबाबत आहे. त्यामुळे माढ्यातील लोकसभा उमेदवारीचा तिढा जसा राष्ट्रवादीत आहे तसाच तो भाजपमध्येही आहे हे स्पष्ट झाले आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना माढातून उमेदवारी द्यावी, असा आग्रह धरला. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाला विरोध करत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उभे रहावे किंवा माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात यावी, यावर चर्चा झाली.

संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. मात्र, मोहिते-पाटील यांना जिल्ह्यांमध्ये प्रबळ विरोधक म्हणून समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असताना देखील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भाजपच्या सोबतीने मिळवला. तसेच जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीला बाजूला ठेवत तिसरी आघाडी देखील समोर आणली आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभा करायचा आणि निवडून आणायचा असेल तर संजय शिंदे आणि त्यांच्या तिसऱ्या आघाडीला विश्वासात घेतल्याशिवाय माढ्यातील विजय सुकर होणार नाही. याची कल्पना असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संजय शिंदे यांना चर्चेसाठी बोलावले. संजय शिंदे करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे सध्या तरी त्यांचा लोकसभेसाठी जाण्याचा विचार नाही, मात्र भाजपकडून संजय शिंदे यांना माढा लोकसभा लढवावी, यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.

No comments:

Post a Comment

Pages