बदलतं राजकारण- ‘ताटातलं वाटीत अन् वाटीतलं ताटात’ ...तर मग भाजपात आणि काँग्रेसमध्ये फरक तो काय? - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 28 March 2019

बदलतं राजकारण- ‘ताटातलं वाटीत अन् वाटीतलं ताटात’ ...तर मग भाजपात आणि काँग्रेसमध्ये फरक तो काय?

Pandharpur LIVE 27 March 2019भगवान वानखेडे (संपादक- पंढरपूर लाईव्ह)
मोबा. नं. 8308838111


एक वेगळा पर्याय म्हणुन जनतेने भाजपाच्या पारड्यात मतांचं दान भरभरुन टाकलं. जनतेच्या पाठबळावर ‘मोदी पर्व’ अस्तित्वात आलं आणि देशात ‘मोदी लाट’ उफाळुन वर आली. मोदी लाटेत पारंपारिक राजकीय घराण्यातील अनेकांना जनतेनं चीतपट केलं आणि राजकारणाच्या सारीपाटात शिवसेना भाजपाला जिंकुन दिलं. आता काहीतरी बदल घडेल अशी आशा सर्वसाामान्यातुन पल्लवीत झाली. विशेषत:  युवकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर भाजपाने इतर पक्षातील नेत्यांना किंवा त्यांच्या मुलांना भाजपासाठीची दरवाजे खुली करुन भाजपात प्रवेश दिल्यानंतर भाजपाचे काँग्रेसीकरण होतेय की काय? असा प्रश्‍न भाजपाप्रेमींमध्ये निर्माण होऊ लागलाय. ‘ताटीतलं वाटीत; अन् वाटीतलं ताटात’ असं राजकारण सध्या पहावयास मिळत आहे. एकुणच सत्ता चालविणार्‍या नेत्यांची झालेली अदलाबदली पाहुन भाजपा आणि काँग्रेसमध्ये  फरक तो काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

विविध पक्षातील पक्षबदलानंतर देशातील तरुणाईच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका-कुशंकांनी प्रवेश केलाय. राजकारणाच्या सारीपाटामध्ये कोणत्याही परिस्थितीत सत्तासुंदरीने आपल्याच गळ्यात माळ घालावी, यासाठी राजकीय पक्ष सोयीनुसार आपली तत्व आणि भुमिका बदलतात, पक्षाची ध्येय-धोरणंही बदलतात. पिढ्यानपिढ्या राजसत्तेत असणार्‍या कांही राजकीय नेत्यांकडे सत्ता राहिली नाही तर त्यांची अवस्था पाण्याबाहेर तडफडणार्‍या माशासारखी होते. सत्तेत येण्यासाठीची त्यांची तडफड, तगमग लपुन राहत नाही. मग सुरु होतो पडद्यामागचा खेळ. राजकीय डावात यशस्वी होण्यासाठी नेते जो पडद्यामागचा डाव रचतात याची यत्किंचीतही कल्पना त्यांच्या कार्यकर्त्यांना नसते. अचानक नेते आपली बदललेली भुमिका कार्यकर्त्यांसमोर मांडतात आणि क्षणात कार्यकर्त्यांच्या खांद्यावरची उपरणे आणि झेंडे बदलण्याच्या (आदेशवजा) सुचना दिल्या जातात. या सर्व खेळात कार्यकर्त्यांची होणारी घुसमट आणि अवहेलना याच्याशी नेत्यांना काहीच देणेघेणे नसते. कार्यकर्त्यांना आंजारले-गोंजारले आणि त्यांच्या क्षणीक गरजा भागवल्या की, कार्यकर्ते आपण म्हणेल ते करतात याची पक्की खात्री अशा नेत्यांना असते. पण काळ बदललाय, कार्यकर्तेच काय तर सर्वसामान्य माणुस सुध्दा आता सोशलमिडीयाच्या माध्यमातुन व्यक्त होऊ लागलाय. 

ज्या पध्दतीने आपापल्या सोयीनुसार राजकीय पक्ष व राजकीय नेते आपापल्या भुमिका बदलु लागले आहेत त्याच पध्दतीने आता त्यांचे कार्यकर्ते सुध्दा आपापल्या सोयीनुसार आपल्या भुमिका बदलु लागले तर यात नवल वाटुन घेवु नये. पिढ्यानपिढ्या राजसत्तेचा उपभोग घेणार्‍यांच्या मुलांना, नातवंडांना उमेदवार म्हणुन उभं केलं जातंय, सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र कायमच सतरंज्या उचलण्याचं काम करतोय. याची खंत मनात बाळगुन गपगुमान नेते म्हणतील तशा होकाररार्थी माना डोलावणार्‍या कार्यकर्त्यांनी नकारार्थी माना हलवण्यास सुरुवात केलेली आढळतेय. कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद सोशल मिडीद्वारे व्यक्त होताना दिसत आहे. भाजपाला ज्याप्रमाणे जनमताचं पाठबळ लाभलंय ते तसंच राहील असं नाही आणि पक्ष बदलणार्‍या नेत्यांना पक्ष बदलल्यानंतरही निवडणुक जिंकणं सोप्पं जाईल असं नाही. कारण जनतेचा कौल आणि कार्यकर्त्यांच्या निर्णयाचं वारं कधी कोणत्या दिशेला फिरेल याचा काहीच नेम नाही. 


📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com No comments:

Post a Comment

Pages