ओडिशा- फनी चक्रीवादळाचा यशस्वी सामना; भारताचे जगभर कौतुक - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 5 May 2019

ओडिशा- फनी चक्रीवादळाचा यशस्वी सामना; भारताचे जगभर कौतुक


भुवनेश्वर : ओडिशात फनी चक्रीवादळाने आतापर्यंत १६ बळी घेतले असून हे वादळ अत्यंत विध्वंसक मानले जात आहे. परंतु, ओडिशा सरकारचे उत्तम नियोजन, हवामान खात्याच्या सूचना, भारतीय संस्थांचे व्यवस्थापन व स्वयंसेवी संस्थांनी प्रसंगावधान राखत दाखवलेली सक्रियता यामुळे जीवितहानी कमी झाली. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. फनी चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत जगातील सर्व देशांनी आणि संयुक्त राष्ट्राने भारताचे कौतुक केले आहे. आपत्ती निवारणाच्या क्षेत्रात ओडिशा हे राज्य ग्लोबल लीडर असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. याआधी २०१५ साली ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा संयुक्त राष्ट्राने सत्कार केला होता.

फनी चक्रीवादळात १६ ठार, १ कोटी लोकांना बसला फटका

ओडिशामधील फनी चक्रीवादळात मृतांची संख्या आतापर्यंत १६ वर पोहोचली आहे. राज्यातील जवळपास १० हजार गावे आणि ५२ शहरी भागांमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. या चक्रीवादळाचा सुमारे १ कोटी लोकांना फटका बसला असल्याची माहिती अधिका-यांनी दिली. १६ मृतांपैकी ४ जण मयूरभंज येथील असून पुरी, भुवनेश्वर आणि जाजपूर येथील प्रत्येकी तीन जण आहेत. क्योंझर, नयागढ आणि केंद्रपाडा येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला.


या भीषण चक्रीवादळात २४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे होते. यामुळे शुक्रवारी पुरीमध्ये जोरदार पाऊस झाला. हे वादळ पश्चिम बंगालमध्ये शिरण्यापूर्वी गावातील काही घरांची छते उडून गेली. तर, काही कच्ची घरे जमीनदोस्त झाली. हे चक्रीवादळ अत्यंत शक्तिशाली असून ग्रीष्म कालीन चक्रीवादळांमध्ये अगदी क्वचितच असे वादळ येते. असे वादळ ४३ वर्षांनंतर प्रथमच आले आहे. तसेच, ते मागील १५० वर्षांतील ३ सर्वाधिक ताकदवान वादळांपैकी एक होते. याआधी १९९९ मध्ये सुपरसायक्लॉन नावाचे वादळ आले होते. यात तब्बल १० हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच, मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता.
दरम्यान, नैसर्गिक संकटांवर लक्ष ठेवणा-या संयुक्त राष्ट्राच्या यूएनआयएसडीआरचे प्रमुख मामी मिजुतोरी म्हणाले, हवामान विभागाने सातत्याने अचूक माहिती दिली. त्यामुळे सरकारला १२ लाख लोकांना हलवण्यासाठी वेळ मिळाला.


जगभरातील वृत्तपत्रांनी केले कौतुक

न्यूयॉर्क टाइम्स : लोकांना कसे वाचवावे, गरीब राज्याकडून शिका

फनी चक्रीवादळाच्या तीव्रतेने जगाला थक्क केले होते. मात्र भारतातील ओडिशा हे राज्य या वादळाचा सामना करण्यास सज्ज होता. वादळात लोकांचे जीव कसे वाचवावे हे भारतातील एका गरीब राज्याने जगाला दाखवून दिले आहे. सरकारने २६ लाख लोकांना मेसेज पाठवून सतर्क केले. टीव्हीवर जाहिराती दिल्या.

बीबीसी : संकटांचा सामना करण्याची शक्ती भारताने वाढवली

१५ हजार लोकांचा बळी घेणा-या १९९९ च्या वादळापासून ओडिशाने धडा घेतला. हा एक आदर्श आहे. अत्यंत कमी वेळेत लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. विशेष म्हणजे देशात निवडणूक सुरू असतानाही मदतकार्य व्यवस्थित व्हावे, यासाठी आयोगाने आचारसंहिता शिथिल केली.

ओडिशामध्ये चक्रीवादळाशी झुंज देणा-या मराठी अधिका-यांचे कुशल नेतृत्व

फणी चक्रीवादळाने थैमान घातल्यानंतर ओडिशा राज्य प्रशासन सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देत आहे. यात ओडिशामध्ये विविध भारतीय सेवेत साधारण ३०-३५ मराठी अधिकारी अत्यंत कौशल्याने ही परिस्थिती हाताळत आहेत.
ओडिशाला वादळं नवीन नाहीत. याआधीही किनारपट्टी असलेल्या या राज्याला फायलिन, तितलीसारख्या चक्रीवादळांचा तडाखा बसला आहे. या संकटाचा सामना करण्याची जबाबदारी प्रशासकीय सेवेतील अधिका-यांवर असते.
ओडिशामध्ये रुजू झालेल्या मराठी अधिका-यांची संख्या लक्षणीय आहे. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वनसेवा अशा विविध सेवांमध्ये कार्यरत असणा-या अधिका-यांची संख्या अंदाजे ३०-३५ आहे, असे ओडिशाचे एका आयएएस अधिका-यांनी सांगितले.

-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

No comments:

Post a Comment

Pages