दिल्लीत खळबळ... "या...मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो" म्हणत 'त्याने' केला सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलनकर्त्यांवर गोळीबार


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
दिल्लीतील जामिया परिसरात माथेफिरूकडून गोळीबार करण्यात आला असून, या गोळीबारात विद्यार्थी जखमी झाला आहे. नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान एका माथेफिरू तरुणाने गोळीबार केला, अशी माहिती मिळाली आहे.

सीएए आणि एनआरसी विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने, निदर्शने सुरू आहेत. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जामिया विद्यापाठ ते राजघाट मार्गादरम्यान मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात एका माथेफिरू तरुणाने गोळीबार केला. या गोळीबारात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. अज्ञात माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आमचा मोर्चा सुरु असताना अचानक एक तरुण अचानक समोरच्या दिशेने आला आणि हवेत गोळीबार करत म्हणाला, "या...मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो आणि मग त्याने गोळी झाडली."

शेजारी उभा असलेल्या शादाब आलम या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्याला गोळी लागली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी जामिया ते राजघाटपर्यंत आंदोलन करण्याला परवानगी नाकारली होती तरीही निषेध करण्यासाठी स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत.

हा पिस्तुलधारी तरुण जय श्रीरामच्या घोषणा देत जमावाच्या दिशेने जात असताना पोलिस मात्र हातावर हात ठेवून बघत राहिल्याचे चित्रीकरण उपलब्ध झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्त्यारीत असणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित तरुणाचे नाव गोपाल असे असून तो ग्रेटर नोएडातील जेवर गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी मात्र तो अल्पवयीन असल्याचे म्हटले आहे.

एक विद्यार्थी जखमी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरही एका माथेफिरूने 30 जानेवारीला भरदिवसा गोळ्या झाडल्या होत्या, त्याच दिवशी त्याच दिल्लीत पोलिसांच्या देखत शांतताप्रिय आंदोलकांवर गोळ्या चालविल्या गेल्याचा "योगायोग' आम आदमी पक्षाने अधोरेखित केला आहे. गोपाल याला पकडण्याचा प्रयत्न करणारा शादाब आलम हा वृत्तपत्रविद्या-संज्ञापन विभागाचा (मासकॉम) विद्यार्थी त्याच्या पिस्तुलाची गोळी लागून जखमी झाला असून त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. गोपाल गोळीबार करताना "इस देश में रहेना होगा, तो वंदे मातरम्‌ कहना होगा' असेही बरळत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

पोलिसांवर संशय
जामिया कृती समितीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून काळ्या कायद्याविरुद्ध राजघाटापर्यंत मोर्चा आयोजित केला होता. तो सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधी ही घटना घडली. माथेफिरू गोपाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला आहे. गोपाल याला या परिसरात यापूर्वी कधी पाहिले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र हातात सोनेरी रंगाचे पिस्तूल घेऊन तो भरदिवसा गोळीबार करत आंदोलकांच्या दिशेने जात असताना व त्याचे चित्रीकरणही सुरू असताना दिल्ली पोलिस काय करत होते, असा सवाल उपस्थित होत आहे.

हल्ल्याआधी फेसबुक लाईव्ह
गोपालच्या फेसबुक अकाउंटचे नावच "रामभक्त गोपाल' असे असल्याचे समोर आले आहे. गेले काही दिवस तो अतिशय भडक व धर्मांध मेसेज देणाऱ्या फेसबुक पोस्ट करत असल्याचे दिसून आले आहे. आज दुपारी मोर्चा निघण्याच्या आधी गोपाल आंदोलकांच्या दिशेने पिस्तूल रोखून आला. त्याआधी तीनदा त्याने फेसबुक लाईव्ह करून आपला नापाक इरादा पुरेसा स्पष्ट केला होता. मात्र सोशल मीडियावर भाजपच्या विरोधातील माहितीबाबत तत्काळ कारवाई करणारे दिल्ली व उत्तर प्रदेश पोलिस गोपालच्या फेसबुकवरील धर्मांध व भडक भाषेच्या बाबतीत झोपले होते का, असा सवाल उपस्थित होत आहे.

खान यांची टीका
या भागातील लोकप्रिय आमदार अमानतुल्ला खान यांनी, भाजप व अमित शहा यांच्या इशाऱ्यानेच गोपालने आंदोलकांवर गोळीबार केला, असा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, ""दिल्लीत विकासाच्या नावावर मते व विजयही मिळणार नाही, हे लक्षात येताच भाजपने निवडणुकीला हिंदू-मुसलमान असा रंग देण्याचे कारस्थान रचले आहे. भाजपचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपविरोधक गद्दारांना गोळ्या मारण्याचे आवाहन केले होते, गोपाल याने त्यांच्या सूचनेचे पालनच केले आहे.''

भाजप नेते अनुराग ठाकूर यांनीच देशद्रोह्यांना गोळ्या घालण्यात यावे, असे आवाहन जमावाला केले होते, या विधानाबद्दल त्यांना अटक करण्यात यावी.
डी. राजा, नेते भाकप