पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


 

Pandharpur Live : 
 “सिंहगडच्या" विद्यार्थ्यांनी जोपासले स्नेहसंमेलनातून “मुल्य"
पंढरपूर: प्रमोद बनसोडे -   
 कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन एक विशिष्ट आदर्श बनलेले , सामाजिक विषयांना याद्वारे सक्षमपणे वास्तवात मांडणारे, शिस्तप्रिय असणारे व रसिकप्रिय  म्हणून सुप्रसिद्ध असलेले सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी येथील १० वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.
         सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी, पंढरपूर यांच्या वतीने आयोजित चालू शैक्षणिक वर्षात वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन सोलापूर चे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव व दुस-या दिवसाचे  उद्घाटन  पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.अनिकेत मानोरकर यांच्या हस्ते झाले. तसेच पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पस डायरेक्टर कैलाश करांडे, प्राचार्या सौ. स्मिता नवले, मुख्याध्यापिका सौ. स्मिता नायर, जॉइंट इस्टेट मॅनेजर जयंत गोरे, प्रा. दादासाहेब नवले, श्री. सोमनाथ नवले आदी उपस्थित मान्यवर  यांनी सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपजिल्हाधिकारी गजानन गुरव म्हणाले, आजच्या युगात मुलांसाठीची मैदाने संपत आहेत तर मुलांच्या मनातील कला, क्रिडा व एकुणच विविध नव नवीन गोष्टी शिकण्याचा कल देखील कमी होत आहे. मोबाईल, इंटरनेट व एकुणच अशा साधनात आजचा विद्यार्थी व्यस्त असून भविष्यात याचा गंभीर परिणाम त्यास सहन करावा लागेल. पण अशा स्नेहसंमेलनातून मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेमार्फत होणारे प्रयत्न समाजहितासाठी महत्वपूर्ण ठरत असल्याचे मत गुरव यांनी बोलताना व्यक्त केले.
  स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी प्रास्ताविक करताना स्कूलच्या शैक्षणिक प्रगतीचा वार्षिक आढावा उपस्थितांना सांगितला. 
 या स्नेहसंमेलनात वैयक्तिक, राष्ट्रीय व जागतिक मूल्य यांचे सुरेख सादरीकरण विद्यार्थ्यांनी सादर केले. सर्वच शिक्षकांनी या विषयांना यशस्वीपणे मांडताना विविध कलाप्रकार, नृत्यप्रकार, विशिष्ट पेहराव, संगीत, रंगमंच सजावट यांचा  सूरेख वापर केला.सरस्वती वंदना, गणेश वंदना, तबला वादन, अॉर्केसट्रा, वैयक्तिक, राष्ट्रीय व जागतिक मुल्य विषयक नृत्य व काही नाटक विद्यार्थ्यांनी सादर केले. दरवर्षी प्रमाणे विशेष आकर्षण असलेले  विशेष नृत्य संगती, रंगमंच व तबला वादन तसेच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवबा आमचा मल्हारी गीतातुन त्यांच्या मूल्यांची आठवन करून दिली. ढोल, ताशा, तबला, गायन, ट्रिपल, झांज,कॅसिओ इत्यादी वाद्यांचा गजरात तसेच त्यांनी परिधान केलेल्या पेहरावामूळे संपूर्ण वातावरण   उत्साही होते.
  या स्नेहसंमेलनात एकुण 1300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. याकार्यक्रमासाठी सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टीचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांरी यांनी परिश्रम घेतले.