‘सामाजिक ऋणानुबंधाने माणसे दीर्घायुष्यी बनतात’ - सिनेकलावंत सुशांत शेलार


पंढरपूर – “राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना शारीरिक श्रमाबरोबर बौध्दीक तंदुरुस्त करण्याचे कार्य करते. विचार आणि कृती ही माणसाच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, चिंतन, मनन याबरोबरच शारिरीक श्रम केले पाहिजेत. सामाजिक ऋणानुबंधाने माणसे दीर्घायुष्यी बनतात. आरोग्य, शिक्षण, स्वास्थ हे निरोगी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा शिबिरात सहभाग घेतला पाहिजे” असे प्रतिपादन सिनेकलावंत सुशांत शेलार यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’च्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे हे होते. यावेळी मंचावर लक्ष्मणआबा  पवार, वसंतनाना देशमुख, राजेंद्र पाटील, सुभाषगराव माने, रजनीताई देशमुख, मनोज गायकवाड, दिलीप कोरके, माजी प्राचार्य आर. डी. पवार व सरपंच सौ. जाई दिलीप कोरके आदी मान्यवर होते.
सुशांत शेलार पुढे म्हणाले की, “खरा भारत खेड्यात आहे. शहरी संस्कृतीच्या मोहात पडण्याऐवजी विद्यार्थ्यांनी खेड्यांचा विकास करण्यासाठी झटले पाहजे. खेड्यातील माणूस शिक्षण, व्यवसाय या निमित्ताने शहरात जातो. खेड्याशी असलेला संबंध तोडतो. खेड्यात राहणे म्हणजे अधोगती अशी रुढ समजूत टाकून दिली पाहिजे. खेड्यात आपली माणसे असतात. या माणसात मिसळून आपलेपण जपण्याचे काम विद्यार्थ्यांनी आयुष्यभर करावे.”
अध्यक्षीय भाषणात आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की, “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी गावात चांगली कामे केलेली आहेत. आपल्या श्रमातून त्यांनी गावकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांचा हा श्रमाचा व त्यागाचा आदर्श ग्रामस्थांनी घेवून गावाच्या विकासासाठी कायम प्रयत्न करने गरजेचे आहे. आदर्श गावाच्या निर्माणासाठी शासन पातळीवरुन आवश्यक मदत करण्याचे काम करतो. मात्र गावाने शिक्षण, आरोग्य व गावसुधारणांची कामे हाती घेतली पाहिजेत”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. दादासाहेब हाके यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय रा. से. योजनेचे विभागीय समन्वयक  डॉ. चंद्रकांत काळे यांनी करुन दिला. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, दिलीप कोरके, राजू बापू पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास डॉ. सौ. एफ. एस. बिजापुरे, प्रा. सुभाष कदम, प्रा. अमोल मोरे, प्रा. जालिंदर वाघ, प्रा. सागर शिवशरण, डॉ. अनिस खतिब, प्रा. अलका घोडके, प्रा. श्रेया भोसले, प्रा. धनश्री घाडगे, स्वयंसेवक, स्वयंसेविका, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सरिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. घन:श्याम भगत यांनी मानले.

Post a Comment

0 Comments