पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती संदर्भातील महत्वाची बातमी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 15 January 2020

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती संदर्भातील महत्वाची बातमी


पंढरपूर दि. 15 :- राज्यसरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ पंढरपूर तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी योग्य प्रकारे काम करावे. कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

                शेतकी भवन, पंचायत समिती पंढरपूर येथे महात्मा  जोतिराव फुले कर्जमुक्ती बाबत बैठक  घेण्यात आली. या बैठकीस सहाय्यक निंबंधक सुदाम तांदळे,  जिल्हा अग्रणी बॅकेचे  संतोष सोनवणे, बँक ऑफ इंडिया पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक  दिलीप कुमार आदी  उपस्थित होते.

                यावेळी प्रांतधिकारी बोलताना म्हणाले,  कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहित धरण्यात येईल. या योजनेसाठी तालुक्यातील सर्व  सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँकांनी आवश्यकती  तात्काळ  कार्यवाही  करावी. बँकांनी संबंधित शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्न करुन घ्यावेत.  ज्या कर्ज खात्याला आधार जोडणी झाली नाही अशा कर्जदारांची यादी मराठी मध्ये तयार करुन शेतकऱ्यांना आधार जोडणी बाबत आवाहन करावे. तसेच  कर्जमुक्तीचा लाभ मिळविण्यासाठी ज्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न केला नाही त्यांनी त्वरीत आधार क्रमांक लिंक करुन घ्यावा तसेच ज्यांचे आधार  नाहीत त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करुन घ्यावी. असे आवाहन ही प्रांतधिकारी ढोले यांनी यावेळी केले.

                महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत आधार लिंक नसणाऱ्या पात्र शेतकऱ्यांची यादी तहसिल कार्यालय व संबंधित ग्रामपंचायत येथे प्रसिध्द करण्यात आली असून, ज्या शेतकऱ्यांचे नांव यादीत आहे अशा संबंधित शेतकऱ्यांनी आपले नांव असल्यास त्वरीत आधार कार्ड  बँकेशी लिंक करु घ्यावे असे आवाहन सहाय्यक निंबंधक तांदळे यांनी  यावेळी केले. यावेळी  तालुक्यातील राष्ट्रीय कृत बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक, व्यापारी बँकेचे अधिकारी  उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Pages