माघवारीत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या... माघी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या सुचना - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 28 January 2020

माघवारीत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या... माघी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या सुचना


   
पंढरपूर दि. 28:- माघवारी कालावधीत सर्व विभागांनी समन्वय ठेवून सोपविलेल्या कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी. स्वच्छतेला प्राधान्य देवून, यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.
माघवारी नियोजनाबाबत प्रांत कार्यालय,सांस्कृतिक भवन येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस तहसिलदार वैशाली  वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विशाल बडे, मुख्याधिकारी अनिकेत महानोरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ.जयश्री ढवळे, पोलीस निरिक्षिक किरण अवचर, पोलीस निरिक्षक दयानंद गावडे, मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, सा.बां विभागाचे हनुमंत बागल, न.पाचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर आदी उपस्थित होते.
यात्रा कालावधीत नगरपालिकेने शुध्द व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, नदीपात्रातील  वाळवंटाची व घाटाची स्वच्छता करावी, मंदीर परिसरात अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी. तात्पुरते शौचालयाचे उभारणीचे नियोजन करावे.येणाऱ्या भाविकांना व शहरवासियांना वारी कालावधीत व वारी नंतर अस्वच्छतेमुळे त्रास होणार याची दक्षता घ्यावी. 65 एकर मध्ये भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेसा वीजपुरवठा आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात  अशा सुचनाही प्रांतधिकारी ढोले यांनी दिल्या.

आरोग्य विभागाने वारी कालावधीत  वैद्यकीय पथके कार्यरत ठेवावी त्या मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी त्याचबरोबर पुरेसा आवश्यक औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा. सुसज्ज रुग्णवाहिका कार्यरत ठेवाव्यात. मंदीर समितीने  भाविकांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी पत्राशेड,दर्शनबारी व दर्शन मंडप येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. पाटबंधारे विभागाने नदीपात्रात पाणी सोडण्याबाबतचे योग्य नियोजन करावे. वारी कालावधीत वीज वितरण विभागाने अखंडीत वीज पुरवठा सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी असेही प्रांतधिकारी ढोले यांनी सांगितले.
            यावेळी प्रांतधिकारी ढोले यांनी सार्वजनिक बांधकाम, एस.टी.महामंडळ, तहसिल, उप प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग, कृषि उत्पन्न बाजार समितीसह आदी विभागांचा आढावा घेवून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

add