मकर संक्रांत- तिळासारखे लहान होणे आणि गुळासारखी मधुरता आणणे! (मकर संक्रांतीनिमित्त विशेष लेख)

Pandharpur Live : 
आपल्या हिंदुस्तानात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. त्या प्रत्येक सणामागे अध्यात्म दडलेले आहे. आज संक्रांतीचा पावन दिवस. आपल्याकडे संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. काय असेल त्यामागील कारण ?

तिळ म्हणजे तिळासारखे लहान होणे आणि गूळ म्हणजे वाणीत, स्वभावात मधुरता आणणे. 

तिळासारखे लहान होणे म्हणजे काय ? तर आपला अहंकार नष्ट करणे, आपले अस्तित्व सद्गुरुचरणी अर्पण करणे , आपण मी’ पणाने नाहीसे होणे , आपण लहान बालकाप्रमाणे शुद्ध, निर्मळ, निरामय आणि वासनारहित होणे. लहान बालक आपणास घ्यावेसे वाटते, कारण ते स्फटिकासारखे स्वच्छ, निर्मळ असते. Devoid of hatred, lust, avarice, selfishness, and ego.  तसे आपण व्हावे हा तिळ वापरण्यामागील उद्देश असावा. 

लहान होण्याचा दुसरा अर्थ मन सूक्ष्म करणे. मन सूक्ष्म झाले कि ते सूक्ष्म परमात्याशी तादात्म्य पावते. Communion of Aatman with Paramatman. Merging of individual soul into Divine Soul. असे मन सूक्ष्म होण्यासाठी ते शुद्ध व्हावे लागते. आणि मन शुद्ध होण्यास नाम घेणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

गूळ वापरण्यामागील उद्देश हा असावा की गुळ हा जात्याच मधुर असतो , तसे आपला स्वभाव आणि मन , मधुर करणे. वास्तविक ज्यापासून गुळ तयार केला जातो तो ऊस कसा असतो?

उस डोंगा परी रस नाही डोंगा।

काय भुललासी वरलिया रंगा॥  -संत चोखामेळा

जरी आपण लौकिक शरीराने उसासारखे बेढब असलो, कुरूप असलो तरी आपले अंतरंग

भगवंताच्या प्रेमाने, माधुर्याने , भक्तीने भरलेले असले तर आपण उसाच्या रसासारखे मधुर, रसपूर्ण होऊन जाऊ आणि इतरांचे जीवन देखील तसेच बनवू शकू.

दरवर्षी आपण संक्रांत साजरी करून गोड बोलायचा संकल्प करतो. संत कबीर म्हणतात-

जिहि शब्दे दुख ना लगे, सोई शब्द उचार

तप्त मिटी शीतल भया, सोई शब्द तत सार्॥ 

Meaning : “Speak only those words which do not hurt. Speech is powerful enough that it can comfort the heart and cool down the fire.”

श्री म्हणतात, ज्याने जिव्हा जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. कारण जिव्हेनेच आपण कोणाचे मन दुखावण्याचा संभव असतो.

जिभ्या जिन बस मे करि, तिन बस कियो जहान 

नहि तो अवगुन उपजै, कहि सब संत सुजान॥ 

Meaning : “One who has controlled his tongue, he has controlled the world. Otherwise the vice grows, so say all the wise saints.”

श्री पुढे म्हणतात, जिव्हेची कामे दोन- खाणे आणि बोलणे. किती खावे? तर जेवून झाल्यावर पुनः आग्रह झाला असता तेव्हढेच जेवता आले पाहिजे. अर्थात ट अन्न, ञ पाणी आणि ञ हवा. आणि जिव्हा नामाला लावावी. म्हणजे फालतू बोलणे आणि विचार यांपासून सुटका होईल.

आता हा तिळगुळ नामाचे तूप लावून गोल करायचा. म्हणजे जीवन नामाने भरून टाकायचे. किती नाम घ्यायचे ? तर संत जनाबाईसारखे ;

जिव्हा लागली नामस्मरणी । रित्या मापे भरी गोणी ॥

नित्य नेमाची लाखोली । गुरु आज्ञेने मी पाळी ॥ 

मज भरवसा नामाचा । गजर नाम्याच्या दासीचा ॥

विटेवरी ब्रह्म दिसे । जनी त्यासी पहातसे ॥  

श्रींना हा अभंग फार आवडत असे . श्री सांगत, या जनाबाईने, नामदेवाच्या मोलकरणीने नामस्मरण केले आणि तिचे पोते म्हणजे जीव/देह नामाने भरून गेला. 

आपणही नामस्मरण करतो. मग आपले पोते का भरत नाही? 

श्री म्हणतात, तिचे माप रिकामे होते. त्यामुळे त्यात नाम भरले जात होते. आपले माप म्हणजे चित्त आधीच वासना-विकारांनी भरलेले आहे. त्यामुळे घेतलेले नाम त्यामधून वाहून जाते. गोणीत टाकायसाठी मापात काही राहताच नाही. म्हणून हा देह जर नामाने भरावा असे वाटत असेल तर प्रथम माप रिकामे केले पाहिजे. म्हणजे चित्त शुद्ध झाले पाहिजे. आणि गम्मत अशी कि हे सुद्धा नामस्मरणानेच साधेल.

आपण त्या तिळगुळाच्या लाडूला आकार देतो. जसा आकार देतो तसे तो  निमूटपणे आकार घेतो. तो काही म्हणत नाही कि मला गोल आकार नको, अमकाच हवा. असेच जेव्हा  सद्गुरू आपल्या जीवनाला आकार देत  असतात तेव्हा निमूटपणे पडून राहावे. त्यांचे काम त्यांना करून द्यावे. पूर्ण शरणागत व्हावे.

याला श्री फ़ार सुंदर उदाहरण द्यायचे , ओल्या धोतराचे . ते जसे निमूट पडून रहाते , तसेच निमूटपणे पडून राहून श्रींना त्यांचे काम करू द्यावे .

कुंभार मटक्याला आकार देतो तेव्हा वरून जरी थापट्या मारत असला तरी त्याचा एक हात आतमध्ये आधारासाठी असतो. तसेच श्रीदेखील कधीकधी आपल्यावर रागावतात , पण आपल्या कल्याणाचाच शुध्द हेतू त्यामागे असतो .

जसे तो कुंभार आकार देऊन झाल्यावर त्या मटक्याला भट्टीत जाळतो तसे सद्गुरूहि कधी-कधी आपली परीक्षा पाहून आपल्याला भट्टीत टाकलेल्या सोन्यासारखे शुद्ध करून घेतात. पण यासाठी शुद्ध निष्ठा हवी. ते म्हणतील ती पूर्व दिशा, ते  म्हणतील ते ब्रह्मवाक्य !

आपल्यासारखाच एक माणूस रात्रीच्यावेळी एका जंगलातून जात होता. अचानक त्याचा पाय घसरून तो खड्यात पडला. पडता-पडता त्याचा हात एका झुडपाला लागला, आणि तो त्या झुडपाला धरून रात्रभर लटकत राहिला. हात सोडावा तर खाली किती खोल आहे याचा काहीच अंदाज नाही. पहाटे थोडे उजाडल्यावर  त्याने खाली किती खोल आहे हे पहिले, तर फक्त एक फूट खोल होते. 

असेच जेव्हा सद्गुरू आपल्याला एखाद्या कार्यात ढकलतात ,  तेव्हा त्यातील अडचणींचा , संकटांचा खड्डा असाच एक फूटच खोल असतो. पण आपल्याकडे निष्ठेचा अभाव असतो . आपण ठरलो अर्धवट. ना इकडले, ना तिकडले. मग घ्या पुन्हा-पुन्हा जन्म. अडका त्या दुष्टचक्रात.

पुनरपि जननं पुनरपि मरणं , पुनरपि जननी जठरे शयनम् ।

इह संसारे बहुदुस्तारे , कृपयाू् पारे पाहि मुरारे॥
 - आदि  शंकराचार्य.

Meaning : “Born again, death again, again to stay in the mother’s womb ! It is indeed hard to cross this boundless ocean of samsara. Oh ! Murari ! Redeem me through Thy mercy.”

लाडूला आकार देण्यावरून सहज आठवले . श्री देहात असताना उत्सवात पेढे करायला लागत. ते मंदिरातच केले जात. त्याकाळी काही आकार देण्यासाठी साचे नसत. पेढ्यांना हाताच्या तळव्यांनीच आकार दिला जायचा. जेव्हा ब्रह्मानंद महाराज (श्रींचे पट्टशिष्य) पेढ्याला आकार देऊन परातीत टाकत तेव्हा त्या पेढ्यावर  श्रीराम अशी अक्षरे उमटलेली असत. असे नाम रोमारोमात भिनले होते. रामबाई नावाची एक लौकिकदृष्ट्या अशिक्षित गरीब बाई, तिच्या मंदिराला येणार्‍या मनी-ऑर्डर वर सही करता येत नसल्याने अंगठा लावी, तेव्हा श्रीराम अशी अक्षरे उमटत.

असे जीवन नाममय झाले पाहिजे, सद्गुरूचरणी अर्पण झाले पाहिजे, तरच खरी संक्रांत साजरी केली जाईल. 

आणी हे सर्व सम्पूर्ण शरणागतीनें साध्य होते . कारण त्या अवस्थेत ’ मी ’ पणाचा लोप झालेला असतो , आपण काया वाचा मनें  श्रीचरणी अर्पित झालेले असतो . थोडक्यात आपल्याला तुकाराम महारांसारखी शरणागती साधली पाहिजे. ते म्हणतात , 

’ पांडुरंगा पांडुरंगा , 

मी पतंग तुझ्या हाती धागा ॥ 

पंचतत्वाचा केला पतंग , 

धागा लाविला निळा रंग ॥ 

साही शास्त्रांचा सुटला वारा , 

चारी वेदांचा आधार त्याला ॥ 

तुका म्हणे मी झालो पतंग , 

धागा आवरा हो पांडुरंग ॥ 

येथे तुकाराम महाराज स्वतः पतंग बनून त्याचा दोर पांडुरंगाच्या हाती सोपवतात. 

श्री म्हणतात, रणांगणावर अर्जुनाने जसा आपल्या रथाचा लगाम भगवंताच्या हाती सोपवला, तसा आपण आपला प्रपंच सद्गुरुंच्या हाती सोपवावा आणि निश्चिन्त व्हावे आणि त्यांना अत्यंत आवडणारे भगवंताचे नाम घ्यावे.

आणि असे नाम घेतल्याने परमेश्वर आपणांस कसे सांभाळतो हे सांगताना एकनाथ महाराज  म्हणतात , 

आवडीने भावे हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥ 

नको करू खेद कोणत्या गोष्टीचा । 
पती लक्ष्मीचा जाणतसे ॥ 

सकळ जीवांचा करितो सांभाळ । 
तुज मोकलिल ऐसे नाही ॥ 

जैसी स्थिती आहे तैशापरी राहे। 
कौतुक तू पाहे संचिताचे ॥ 

एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा। 
हरिकृपे त्याचा नाश झाला ॥

एक अडाणी मनुष्य श्रींना म्हणाला, महाराज ! मला गीता कळत नाही. मी काय करू? श्री म्हणाले, तू फक्त त्यावर रेखाटलेले चित्र लक्षात ठेव की अर्जुनाने आपल्या रथाच्या दोर्‍या भगवंताच्या हाती दिल्या आहेत. हे मनावर बिंबवणे हाच परमार्थ. अहो एवढे सोपे करून कोणीच सांगितलेले नाही.

तूं माझा यजमान रामा । तूं माझा यजमान ॥ धृ॥ 

जननीजठरीं रक्षियलें मज । पोषुनि पंचहि प्राण ॥  :- मध्वमुनीश्वरस्वामी.

असो, तर आजच्या या संक्रांतीच्या पावन दिवशी जसा सूर्य एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो, तसे आपणही देहबुद्धीतून आत्मबुद्धीत प्रवेश करून ’ मी ’ चे स्वरूप समजून घेउन ’ मी ’ तोच ’ परमेश्वर ’ आहे याचा अनुभव घेउ . मनाचे परिवर्तन करून , मनाचे उन्नयन करून आत्मज्ञानाचे अधिकारी होऊ .

आणि त्यासाठी संत नरहरी महाराजांसारखी भगवंताला आळवणी करून संकल्प करूया ;

सोडूं नये तुझे स्मरण । 
ऐसे करीं माझें मन ॥

माझें चित्त तुझे पायीं । 
राहो ऐसें करीं कांही ॥

मागणें तें हेंचि मागो । 
आणिक न लागो छंदासी ॥ 

काया वाचा आणि मन ।  समर्पिले तव चरणीं ॥      
 -श्री.निलकंठ वामनराव शिंदे(सर), 
       माध्यमिक कन्या प्रशाला सांगोला.