पंढरीतील सोनार परिवाराचा निसर्गसंवर्धनासाठी स्तुत्य उपक्रम... संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवास आलेल्या महिला भगिणींना दिले बीज-गोळ्यांचे वाण
  • वनक्षेत्राची व्याप्ती वाढविणे ही काळाची गरज

  • भारतीय वृक्षांच्या बीजांपासून बीजगोळे बनवून ओसाड माळरानावर पसरणे अत्यावश्यक

  • संक्रांतीच्या वाण स्वरुपात पाच हजार पाचशे पंचावन्न बीजगोळे 

  • पंढरपूरच्या सोनार परिवाराचे एक पाऊल हरितक्रांतीकडे

  • सणोत्सव पर्यावरण पुरक साजरे करण्यासाठी सोनार परिवाराची साद  
पंढरपूर (प्रतिनिधी) :- भारतीय संस्कृतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याप्रसंगी संक्रांतीच्या निमित्ताने भारतीय महिला भगिनींकडून दरवर्षी हळदी–कुंकू समारंभ साजरा केला जातो. त्यात एकमेकींना भेटणे , ख्यालीखुशाली जाणून घेणे आणि मानवी जीवन हर्षवर्धित करणे हा उद्देश असतो. अनेक भगीनी संक्रांतीच्या निमित्ताने परिचयाच्या सर्व स्त्रियांना एकमेकींच्या आनंदात सहभागी करून घेतात. एकमेकींना संक्रांत वाण म्हणून संसारोपयोगी वस्तू भेट स्वरुपात देतात.
          परंतु आजच्या काळानुसार संक्रांतीचे वाण म्हणून दिल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये आपली संस्कृती आणि परंपरा जपतच काळानुरूप सकारात्मक बदल करण्याची गरज ओळखून पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांच्या सुविद्य पत्नी सौ. सविता रवि सोनार आणि कुटुंबियांनी संक्रांतीचे वाण म्हणून संसारोपयोगी वस्तू सोबतच पृथ्वीतलावरील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून सिताफळ, हनुमानफळ, कवट, लिंबू, बेलफळ, रिठा, करंज, कडुनिंब, एरंड आणि शिकेकाई अशा भारतीय वृक्षांच्या बीजांचे देशी गायीचे शेण आणि कसदार माती यांच्या समसमान संमिश्र चिखलाने तसेच राख, कोळसा भुकटी, पिवळी माती, होरमुज, संगजीरा भुकटी, हळद, कुंकू, खाण्याचे रंग यांमध्ये लाकडी भूसा मिश्रीत आवरणाने बनविलेले बीजगोळे (seedball) भेटस्वरुप दिले आहेत.

             संक्रांत भेटस्वरुप दिलेले बीजगोळे नजीकच्या काळात उन्हाळ्यापूर्वी रस्त्याच्या कडेला अथवा इतरत्र ओसाड माळरानावर हे वेगवेगळ्या दिशांनी पसरावेत असे आवाहन सोनार परिवाराच्या वतीने बीजगोळ्यांसोबतच्या पत्रकामधून करण्यात आले आहे. सर्वच बीजगोळे हे देशी गायीचे शेण आणि कसदार माती यांच्या संमिश्र चिखलाचे असल्याने त्यांची उगवण क्षमता चांगली असल्याने हे बीजगोळे पहिल्या पावसानंतर निश्चितच अंकुरतील व अंकुरलेल्या त्या सर्वच भारतीय वृक्षांची पाने, फुले, मध, सुगंधी अर्क, फळे, बिया, चिक-डिंक, बुंध्या-फांदीचे लाकूड, साली, विविध प्रकारचे तेल आणि मुळ्यासुद्धा आपल्या निसर्गचक्रात, प्राणी-पक्षी-किटक आणि मानवी जीवनात नक्कीच महत्वाची भूमिका असेल असा विश्वास सोनार कुटुंबियांना आहे. 
            काळाबरोबर सणांच्या साजरीकरणाच्या पद्धतीत परंपरा व संस्कृती जपतच नवीन आणि पर्यावरण सुसंगत असे आपण काय करत आहोत हे पाहिले पाहिजे. आपण सर्वांनी आनंदाबरोबरच आत्मिक समाधान आणि जबाबदारी म्हणून असे छोटे - मोठे समाजोपयोगी कार्य करत सण साजरे करायला पाहिजेत हे जाणून सोनार परिवार आणि कुटुंबियांनी संक्रांतीच्या वाणाच्या स्वरूपात हे विविध प्रकारच्या भारतीय वृक्षांचे बीजयुक्त पाच हजार पाचशे पंचावन्न बीजगोळे निसर्गाच्या सान्निध्यात पसरवण्यासाठी पाऊल उचलले आहे. सोनार परिवाराची भूमिका आणि मानस निश्चितच योग्य आहे. सर्वांनीच या कार्यास पुढे नेण्यासाठी सहकार्य करायला पाहिजे.
          वनक्षेत्राची एकूणच व्याप्ती वाढविण्यासाठी सोनार परिवाराने बीजगोळे स्वरुपात हरितक्रांतीकडे टाकलेल्या सकारात्मक पावलामुळे पंढरपूर आणि परिसरातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. तसेच जास्तीत जास्त परिवारांनी हा उपक्रम राबविल्यास निश्चितच सकारात्मक बदल दिसून येईल असा आत्मविश्वासही यानिमित्ताने अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments