भारतातील एकमेव भक्ती व शक्तीचे संगम स्थान राजा हरिश्चंद्र मंदिराचा कलशारोहन सोहळा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 10 February 2020

भारतातील एकमेव भक्ती व शक्तीचे संगम स्थान राजा हरिश्चंद्र मंदिराचा कलशारोहन सोहळा

महाशिवरात्रीनिमित्त भव्य कीर्तन महोत्सव... 
भव्य तयारी सुरु... राज्यभरातून भाविक येणार


Pandharpur Live वडवणी प्रतिनिधी :-
सत्यवादी तथा न्यायनिष्ठ राजा म्हणून जगभरात ख्याती असलेल्या राजा हरिश्चंद्राचे एकमेव मंदिर वडवणी तालुक्यात अस्तित्वात आहे. हरिश्चंद्र पिंपरी येथे असलेल्या या मंदिराचा भव्य असा कलशारोहन सोहळा येत्या रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित केला आहे. तसेच प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भव्य दिव्य अशा कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवात लाखो भाविक राज्यभरातून सहभागी होणार आहेत. या दोन्ही सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरु असून तरी भाविक भक्तांनी या कलशारोहन सोहळा व किर्तन महोत्सवासाठी देणगी रुपये सहकार्य करावे असे आवाहन महंत ह.भ.प.श्री.भगवान महाराज राजपूत यांनी केले आहे.

               रविवारी आयोजित केलेला कलशारोहन सोहळा न्यायाचार्य महंत ह.भ.प.श्री.नामदेव महाराज शास्त्री, श्रीक्षेत्र भगवानगड यांच्या शुभहस्ते होणार आहे. सत्यवादी तथा न्यायनिष्ठ राजा हरिश्चंद्र यांचे भारतातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी या गावी पुरातन मंदिर आहे. प्रभू श्रीरामांचे पूर्वज असणारे राजा हरिश्चंद्र यांचे वास्तव्य लाभलेले आणि स्वप्नात स्वतःचे संपूर्ण राज्य दान दिलेले पुराणातील दंडकारण्यातील ते ठिकाण म्हणजे आजचे बीड जिल्ह्यातील हे मंदिर होय अशी भाविकांची अपार श्रद्धा आहे. याठिकाणी साक्षात्कार झाल्यानंतर थोर संत भगवानबाबा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून महाशिवरात्र महोत्सवाची सुरुवात या ठिकाणी केली होती. संत भीमसिंह बाबांनी ही परंपरा कायम ठेवली. आता महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली राजा हरिश्चंद्र तीर्थक्षेत्राचे महंत भगवान महाराज राजपूत ही परंपरा अखंडितपणे चालवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या शिखराचे काम चालू होते व यांचा कलशारोहण सोहळा करण्याचा निर्णय गेल्यावर्षीच महंत भगवान महाराज राजपूत यांनी जाहीर केला होता. महाशिवरात्र महोत्सवात देशभरातील ख्यातनाम संत महंत यांच्या उपस्थितीत हा सोहळा आता पार पडणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. 

दिनांक १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२० दरम्यान महाशिवरात्र महोत्सवात कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला असून रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी भव्य दिव्य अशा स्वरुपात कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. तसेच कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व नामवंत कीर्तनकार यांचे कीर्तन, प्रवचन, गायनाचा आस्वाद भाविकांना घेता येणार आहे. अशी माहिती भगवान महाराज राजपुत, श्रीक्षेत्र राजा हरिश्चंद्र संस्थान हरिश्चंद्र पिंपरी, ता.वडवणी, जि.बीड यांनी दिली आहे. तसेच ज्या दानशूर भाविक भक्तांना या दोन्ही सोहळ्यासाठी देणगीरुपी मदत करावयाची आहे अशांनी नक्कीच यासाठी हातभार लावावा. देणगीदारांनी ९९२३३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. राजा हरिश्चंद्र पिंपरी येथील हा सोहळा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा असणार आहे तसेच या सोहळ्याला देशभरातील साधुसंत आणि विविध पक्ष संघटनेचे नेते, मंत्री, खासदार, आमदार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री, श्रीक्षेत्र भगवानगड यांच्या शुभहस्ते हा कलशारोहण सोहळा थाटात संपन्न होणार आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही शेवटी भगवान महाराज राजपूत यांनी केले आहे.

add