पाकिस्तानचा १० विकेटनी धुव्वा उडवून भारत अंतिम फेरीत - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Wednesday, 5 February 2020

पाकिस्तानचा १० विकेटनी धुव्वा उडवून भारत अंतिम फेरीत


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
पोटचेफ्स्टूम : सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकी आणि दिव्यांश सक्सेनाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आयसीसी १९ वर्षाखालील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या साामन्यात पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १० विकेटनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. यशस्वी जैस्वाल सामन्याचा मानकरी ठरला.

विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने ३५.२ षटकात बिनबाद १७६ धावा करत सहज पूर्ण केले. भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने ११३ चेंडूत ८ चौकार व ४ षटकारासह नाबाद १०५ तर दिव्यांश सक्सेनाने ९९ चेंडूत ६ चौकारासह ५९ धावांची खेळी करत भारतीय संघास विजय मिळवून दिला.


पाकिस्तानच्या एकाही गोलंदाजांला गडी बाद करण्यात यश आले नाही आणि भारताने पाकला पराभूत करत यशस्वीपणे अंतिम फेरी गाठली.

372 people are talking about this
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार रोहेल नजीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने हैदर अलीच्या ५६(७७), रोहेल नजीरच्या ६२(१०२) आणि मोहम्मद हारिसच्या २१(१५) धावांच्या खेळीच्या जोरावर ४३.१ षटकांत सर्वबाद १७२ अशी मजल मारली होती. या तिन्ही फलंदाजांशिवाय एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
भारतीय संघाकडून गोलंदाजीत सुशांत मिश्राने ८.१ षटकांत २८ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. कार्तिक त्यागीने ८ षटकांत ३२ धावा देत २, रवि बिश्नोईने १० षटकात ४६ धावा देत २, अथर्वा अन्कोलेकरने ७ षटकांत २९ धावा देत १ आणि यशस्वी जैस्वालने ३ षटकांत ११ धावा देत १ गडी बाद केला.

add