जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या पोलीसांवर हल्ला... उपनिरीक्षकासह 3 पोलीस गंभीर जखमी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 12 February 2020

जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या पोलीसांवर हल्ला... उपनिरीक्षकासह 3 पोलीस गंभीर जखमी


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
आकुर्डे (ता. भुदरगड) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या भुदरगड पोलिस ठाण्याच्या पथकावर जमावाने हल्‍ला करून उपनिरीक्षकासह तिघा पोलिसांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

आकुर्डे येथे प्राथमिक शाळेशेजारी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती भुदरगड पोलिसांना नियंत्रण कक्षातून मंगळवारी दुपारी मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख, पोलिस नाईक अनिल चव्हाण, किरण पाटील, दिगंबर बसरवाडकर यांनी छापा टाकला. एका घरातील माडीवर सुमारे दहा ते बारा जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी जुगार्‍यांना पत्ते मोबाईल व खेळत असलेले पैसे एकत्र जमा करण्यास सांगितले. यावेळी एका जुगार्‍याने लघुशंका आल्याचे नाटक केले. पोलिस उपनिरीक्षक त्यास लघुशंकेसाठी जिन्यावरून खाली घेऊन जात होते. यावेळी साहेब त्यांना सोडा, आमची अब्रू जाईल... असे म्हणत या घरातील महिला पोलिसांसमोर आल्या. जुगार्‍याने घरातील महिलांना पाहून चक्‍कर आल्याचे नाटक केले व खाली पडला. जुगारी खाली पडल्याचे पाहून महिलांनी आरडाओरड केली व पोलिसांनी मारहाण केल्याचे बतावणी केली. आकुर्डे येथील जोतिबा देवाची यात्रा असल्यामुळे गावात मोठी गर्दी होती. त्यातच एक जण पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावल्याची अफवा पसरली आणि आरडाओरड ऐकून त्या दिशेने जमाव धावून आला. जमावाने पोलिस उपनिरीक्षक अमित देशमुख, हेड कॉन्स्टेबल अनिल चव्हाण, दिगंबर बसरवाडकर यांच्यावर हल्‍ला चढवत मारहाण केली. या मारहाणीत पोलिसांचे कपडे फाटले. हाताला व छातीला मार लागल्याने सहायक पोलीस निरीक्षक अमित देशमुख व हेडकॉन्स्टेबल अनिल चव्हाण गंभीर जखमी झाले, तर दिगंबर बसरवाडकर यांनाही दुखापत झाली आहे.

संतप्त झालेल्या जमावातील काहीजण पोलिसांना घरामध्ये घालून पेटवून देण्याची भाषा करत होते. तर काहीजण अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होते. माजी सरपंच कृष्णात पाटील यांनी चारही पोलिसांना जमावाच्या तावडीतून सोडवून गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

... तर प्रकार घडला नसता
गडहिंग्लज येथील काळभैरी यात्रेच्या बंदोबस्तासाठी पोलिस निरीक्षक संजय पतंगे व इतर पोलीस कर्मचारी गेले आहेत. त्यामुळे गारगोटी ठाण्यात पोलिसांची संख्या अपुरी होती. नियंत्रण कक्षातून जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच केवळ चार पोलिसांना आकुर्डे येथे धाव घ्यावी लागली. पोलिसांची कुमक अधिक असती तर हा प्रकार घडला नसता, अशी चर्चा आहे.

No comments:

Post a Comment

Pages