धक्कादायक- पुण्यातील सासवडमध्ये सुरू होता ड्रग्सचा कारखाना... एटीएस ने केले रॅकेट उघड... 9 कोटी 80 लाखाचे ड्रग्स जप्त! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 21 February 2020

धक्कादायक- पुण्यातील सासवडमध्ये सुरू होता ड्रग्सचा कारखाना... एटीएस ने केले रॅकेट उघड... 9 कोटी 80 लाखाचे ड्रग्स जप्त!


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
मुंबई दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) जुहू युनिटने पुणे आणि मुंबई येथे मोठी कारवाई करताना मेफेड्रॉन (एमडी) रॅकेट उद्ध्वस्त करून, कारवाईत 9 कोटी 80 लाखांचे 24 किलो 800 ग्रॅम 'एमडी' नावाचे ड्रग्स जप्त केले आहे. पुण्यातील सासवड येथील दिवे येथे श्री अल्फा केमिकल या कारखान्यात हे उत्पादन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार एटीएसने छापा टाकून उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

महेंद्र परशुराम पाटील, संतोष बाळासाहेब अडके (वय- 29) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना एटीएसच्या जुहू युनिटने 6 डिसेंबर 2019 रोजी अटक केली होती. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संतोष अडके याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करीत असताना एटीएसला त्याचा सासवडमधील दिवे येथे केमिकल कारखाना असल्याचे निष्पन्न झाले. एटीएसने अधिक तपास करून अडकेच्या श्री अल्फा केमिकलवर छापा टाकला असता, 4 कोटी 20 लाखांचे 10 किलो 500 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले असून, ज्या ठिकाणी हे एमडी बनवले जात होते, त्या प्लांटची किंमत 1 कोटी 20 लाख रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते जप्त करण्यात आलेल्या कच्च्या केमिकलपासून तब्बल 200 किलो एमडीचे उत्पादन करण्यात येणार होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 80 कोटी रुपये असल्याचे एटीएसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर 'एमडी'चे उत्पादन सुरू असताना, पुणे ग्रामीण पोलिसांना व पुणे पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागला नाही, याबद्दल मात्र आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एटीएस प्रमुख देवेन भारती, उपायुक्त विक्रम देशमाने, डॉ. विजयकुमार राठोड, सहायक पोलिस आयुक्त श्रीपाद काळे, पोलिस निरीक्षक दया नायक, सहायक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर, दशरथ विटकर, सचिन पाटील, पोलिस उपनिरीक्षक राऊळ आणि इतर कर्मचार्‍यांनी ही कारवाई केली.

एटीएस पथक दि 19 फेब्रुवारी रोजी दु 12 वाजता सदर कंपनीमध्ये गेले असता, त्यांना अंमली पदार्थाचा साठा व केमिकल आढळून आला. रात्रभर या पथकाची कारवाई सुरु होती. दुसर्‍या दिवशी, गुरुवारी (दि 20) सकाळी 11 नंतर हे पथक निघून गेले. याबाबत सासवड पोलिसानांही याची कल्पना नव्हती. डिसेंबर महिन्यापासून एटीएसचे अधिकारी सासवड पोलीस स्टेशनमध्ये येत होते; मात्र अशा स्वरूपाच्या तपासाची त्यांना माहिती दिली नव्हती. दि 19 रोजीच्या कारवाई वेळी सासवड पोलीस स्टेशन काही कळविले नव्हते. गोडाऊनच्या 80 टक्के भागात वर्कशॉप सुरु असून, 20 टक्के भाग श्री अल्फा केमिकल्सला भाडे तत्वावर दिला आहे. सदर केमिकल कंपनीच्या नावाचा साधा बोर्डही त्याठिकाणी आढळून आला नाही. औषधे बनविण्याच्या नावाखाली या ठिकाणी दुसराच काळा कारभार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतरही ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
कोकेन तस्कराच्या आवळल्या मुसक्या
फोनद्वारे ऑर्डर स्वीकारल्यानंतर दुचाकीवरून कोकेन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन तस्कराच्या गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. व्हेलंन्टाईन उर्फ जेम्स अमुचे ईझेजा (28, रा. हांडेवाडी, मूळ नायजेरिया) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. यावेळी त्याच्या ताब्यातून 34 लाख 2 हजार 800 रुपयांचे 341 ग्रॅम कोकेन जप्त केले. ही कारवाई कात्रज सासवड बायपास रोडवर करण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपी हा वास्तव्याचा कोणताही परवाना नसताना देखील अवैध्यरित्या शहरात राहत असल्याचे समोर आले आहे.
तळेगावात पंधरा लाखांची अफू जप्त
पिंपरी : अफूच्या विक्रीसाठी मुंबईवरून तळेगाव परिसरात आलेल्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन किलो अफू जप्त करण्यात आली. त्याची किंमत 15 लाख रुपये आहे. गुरुवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने तळेगाव येथे ही कारवाई केली. या प्रकरणी राजेंद्र सुवर्णा शेखर सालियाना (28, रा. अंधेरी, मुंबई. मुळगाव सचेर पेटे, तालुका मुंडकुरु, जि. उडुपी, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशनजवळ एकजण संशयितरित्या उभा असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सालियाना यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अफू आढळली.

add