चाकण एमआयडीसीत खळबळ.. कंपनीत घुसुन मालकाची निर्घृण हत्या! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 18 February 2020

चाकण एमआयडीसीत खळबळ.. कंपनीत घुसुन मालकाची निर्घृण हत्या!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
चाकण औद्योगिक वसाहतीत कंपनीत शिरून पाच ते सहा जणांनी कंपनीच्या मालकाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी (दि. 17) दुपारी तीनचे सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. हल्लेखोर चाकण परिसरातील अवैध रिक्षाचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.

हरिश्चंद्र किसनराव देठे ( वय 45, सध्या रा. विश्रांतवाडी , पुणे, मूळ रा. रुई , जि. उस्मानाबाद ) असे या घटनेत खून झालेल्या कंपनी चालकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रमोद वशिष्ठ कोल्हे ( वय 27, रा. आंबेठाण चौक, चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार चाकण आंबेठाण रस्त्यावर बिरदवडी हद्दीत व्ही.एच.डी. इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक हरीश्चंद्र देठे हे असून ते नेहमीप्रमाणे सकाळी कंपनीत आले होते. सकाळी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आलेल्या काही जणांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पाच ते सहाजण कंपनीच्या गेटवर आले. त्यांनी जोरदार दगडफेक सुरु केली.

कंपनीचे मालक देठे बाहेर आल्यानंतर संबंधित पाच ते सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत त्यांना खाली पाडून दगडांनी त्यांच्या डोक्यात जबरदस्त मारहाण केली. देठे कंपनीच्या प्रवेशद्वारावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळा वरून पोबारा केला. जखमी देठे यांना तत्काळ येथील एका खासगी रूग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

संबंधित कंपनीतील कामगार आणि प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार सर्व हल्लेखोर एका प्रवाशी वाहतुकीच्या रिक्षातून घटनास्थळी आले होते; व हल्ल्यानंतर याच रिक्षातून पळून गेले. हल्लेखोरांपैकी एकाची पत्नी याच कंपनीत कामास असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांची दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली. सहा.पोलीस आयुक्त राम जाधव यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

एमआयडीसीमध्ये दहशत
चाकण एमआयडीसी मधील विविध कारखान्यांत निरनिराळ्या ठेकेदारीसाठी या शिवाय अवैध धंद्यातही पुन्हा एकदा मोठी चढाओढ निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. अशातच थेट कंपनीत शिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान अवैध प्रवासी वाहतुकीतील वाहन चालकांचा या खून प्रकरणात सहभाग असल्याची बाब समोर आल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.

add