पंढरीत उद्या ‘पंढरी सायकल मॅरेथॉन-2020’ 1200 सायकल स्वारांचा सहभाग!


Pandharpur Live- 

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमध्ये रविवार दि. 16 फेब्रुवारी 2020 रोजी  ‘पंढरी सायकल मॅरेथॉन-2020’ चे आयोजन जिल्हा सायकल असोशिएशन सोलापूर व आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या सायकल मॅरेथॉनमध्ये 1200 सायकल स्वारांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

नागरिकांमध्ये आारोग्याच्या व इंधन बचतीच्या दृष्टीने पर्यावरण पोषक आवड निर्माण व्हावी म्हणून समस्त पंढरपूरकरांच्या सहकार्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांना सोबत घेऊन माजी नगराध्यक्ष सुभाषदादा भोसले, बालरोगतज्ञ डॉ. शितल शहा, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले, ह.भ.प. नितीन शेळके, नगरसेवक दत्तात्रय धोत्रे, उद्योजक पांडुरंग बापट, साहित्यीक राधेश बादले-पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते संदीप मांडवे, छत्रपती उदयनराजे भोसले सेना प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष शेखर (बंटी) भोसले, अ‍ॅड. अखिलेश वेळापूरे, सौदागर मोळक, जितेंद्र मर्दा आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ‘पंढरी सायकल मॅरेथॉन-2020’ चे आयोजन केल्याची माहिती आयोजक प्रताप कांचन, सागर कदम यांनी दिली.

या मॅरेथॉन मध्ये 1200 सायकलस्वार सहभागी होणार आहेत. यात डॉक्टर, वकील, इंजिनीअर, व्यापारी, उद्योजक, साहित्यीक अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींसह अनेक महिला-भगिणी व लहान मुलांचा सहभाग आहे. या सर्वांचे विविध 4 गटात विभाजन केले आहे. संयोजनामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचेसह 125 स्वयंसेवकांचे योगदान लाभणार आहे. 4 अ‍ॅम्ब्युलन्स सह 10 डॉक्टरांचाही सहभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी 6 वाजता या सायकल मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ होईल. येथून स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, भारतरत्न डॉ. आंबेडकर चौक, प्रबोधनकार ठाकरे चौक, लिंकरोड मार्गे क्रांतीसिंह नाना पाटील चौक, सरगम चौक, इंदिरा गांधी चौक, कर्नल भोसले चौक, पंढरपूर अर्बन बँक, भादुले चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग 14 वर्षावरील स्पर्धकांसाठी असेल तर 14 वर्षाखालील स्पर्धकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, इंदिरा गांधी चौक, कर्नल भोसले चौक, पंढरपूर अर्बन बँक, भादुले चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्ग असेल.