हुशार विद्यार्थ्यातून चांगला शेतकरी घडविण्याचे काम महाविद्यालयांनी करावे – शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 9 February 2020

हुशार विद्यार्थ्यातून चांगला शेतकरी घडविण्याचे काम महाविद्यालयांनी करावे – शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत

 पंढरपूर – “दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने प्राथमिक शाळांमध्ये आणलेल्या विधायक बदलाची चर्चा जगभर होत असताना महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेने केलेला गुणवत्तापूर्ण शैक्षणिक बदल जगाने स्विकारण्यायोग्य आदर्श आहे. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग, व्यापार, शेती या क्षेत्राकडे वळण्याची आवश्यकता आहे. ज्ञानी लोकांनी ज्ञानाचा उपयोग शेती सुधारणा व विकासासाठी केल्यास निश्चितच शेतीला चांगले दिवस येणार आहेत. शेतीच्या विकासाशिवाय देशाला जगाचे नेतृत्त्व करता येणार नाही. म्हणून हुशार विद्यार्थ्यातून चांगला शेतकरी घडविण्याचे काम महाविद्यालयांनी केले पाहिजे.” असे प्रतिपादन शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले.


रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन संजीव पाटील हे होते.

आमदार दत्तात्रय सावंत पुढे म्हणाले की, “महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या ही १२ कोटी ४० लाख इतकी असून केवळ १६ लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत. ही वस्तुस्थिती विचारात घेवून प्रत्येकांनी आपल्यातील टॅलेंट शोधणे गरजेचे आहे. महाविद्यालयामधील शिक्षणाचा उपयोग भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.”

अध्यक्षीय भाषणात संजीव पाटील म्हणाले की, “येणारे दशक हे ज्ञानाचे असून केवळ बुध्दीवंतांची किंमत केली जाणार आहे. युवक ही आपल्या देशाची खरी शक्ती असून यांमधूनच जगाचे नेतृत्त्व केले जाणार आहे. जगभरात असलेल्या सर्वात मोठ्या कंपन्यांचे चीफ एक्झिकेटीव्ह ऑफिसर पदी भारतीय माणसांची नेमणूक होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा व शिक्षा हा दिलेला मुलमंत्र हा जगाने स्विकारला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे स्वप्न ‘रयत विद्यापीठ’ नावाने साकार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा रयत चा ब्रॅण्ड नावलौकिक मिळवत आहे.”

या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करुन झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. हणमंत लोंढे यांनी तर अध्यक्षांचा परिचय डॉ. बजरंग शितोळे यांनी करुन दिला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डाळिंबरत्न दत्तात्रय भोसले यांचा सपत्निक विशेष गुणगौरव व सत्कार करण्यात आला. क्रीडा विभागाचा वार्षिक अहवाल क्रीडा संचालक डॉ. नितीन सोहनी यांनी सादर केला. या कार्यक्रमात राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विभागीय, विद्यापीठ स्तरावर कला, क्रीडा, वक्तृत्त्व, वाङ्मय, नियतकालिक स्पर्धा, युवा महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना आदी विभागात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. 

यावेळी आविष्कार, युरेका, अर्थमंच, संगणक विश्व, आर्थिक जगत, व्हेंचर व क्रीडा विश्व या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य सुभाषआबा  सोनवणे, चंद्रकांत गायकवाड, राजुबापू पाटील, डॉ. राजेंद्र जाधव, बाळासाहेब पाटील (वरवडे), बाळासाहेब पाटील (रोपळे), माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख, गोविंदराव शिंदे, उपप्राचार्य अशोक चंदनशिवे, उपप्राचार्य बजरंग रोंगे, अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, अधिष्ठात डॉ. सुरेश पाटील, अधिष्ठाता डॉ. सुखदेव शिंदे, कार्यालय प्रमुख अनंता जाधव व मुख्याध्यापक शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अमर कांबळे व रघुनाथ पवार यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार विठ्ठल फुले यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सिनिअर, ज्युनिअर, व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, सेवानिवृत्त रयत सेवक, रयत हितचिंतक, रयत प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

add