अभियांत्रिकीबाबत अत्यावश्यक असणाऱ्या माहिती पुस्तिकेचे स्वेरीत प्रकाशन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Friday, 7 February 2020

अभियांत्रिकीबाबत अत्यावश्यक असणाऱ्या माहिती पुस्तिकेचे स्वेरीत प्रकाशन


 स्वेरीमध्ये अभियांत्रिकीसंबंधी मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डावीकडून शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार,सोलापूरच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जे. साळुंखे, रिलायन्स जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद, कृषीभूषण दत्तात्रय भोसले, सौ. प्रमोदिनी भोसले, आदिती भोसले, स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.बी. पवार.
पंढरपूर- भविष्यात अभियांत्रिकीमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणातील प्रदीर्घ अनुभव असणारे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या ‘अभियांत्रिकी महाविद्यालय कसे निवडावे?’ या मार्गदर्शन पुस्तिकेचे स्वेरीत नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

        'सायन्स ओरिएन्टेशन प्रोग्राम'चे औचित्य साधून स्वेरीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केलेली ही २४ पानी छोटी पुस्तिका विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरिता नक्कीच दिशादर्शक आहे. या माहिती पुस्तिकेत अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे, शैक्षणिक अर्हता, विद्यार्थ्यांना प्रवर्गाप्रमाणे मिळणाऱ्या स्कॉलरशिप्स, अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रीये दरम्यान घ्यावयाची काळजी यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच या पुस्तिकेमध्ये गुणवत्तेनुसार स्वेरी अभियांत्रिकीकडून  दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींचा देखील तपशील दिलेला आहे. तसेच विद्यार्थ्याना अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली सीईटी परीक्षा आणि इतर महत्वाच्या वेबसाईट्स दिलेल्या आहेत. या पुस्तिकेमध्ये स्वेरी अभियांत्रिकीमध्ये आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांना मिळालेले पॅकेजेस यांची देखील माहिती दिलेली आहे.


 सीईटीच्या मुख्य परीक्षेपूर्वी सराव चाचण्या सोडविण्यासाठी www.cet.sveri.ac.in या वेबसाईटवर प्रश्नसंच उपलब्ध करण्यात आलेले असून विद्यार्थी या वेबसाईटवर रजिस्टर करून सीईटी परीक्षेची तयारी करू शकतात. या पुस्तिकेत भाभा अणुसंशोधन केंद्राचे डॉ. अखिलानंद पती तिवारी, कॅपजेमीनीचे अमोल हाके, अॅटलास कापकोचे निखील कंदी यांनी मनोगत व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांसाठी बहुमोल ठरणाऱ्या या पुस्तिकेचे प्रकाशन सोलापूरच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जे. साळुंखे, मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.बी. पवार, रिलायन्स जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद, कृषीभूषण दत्तात्रय भोसले, सौ. प्रमोदिनी भोसले, विविध महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार,  शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांच्यासह स्वेरीचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  

No comments:

Post a Comment

Pages