कर्मयोगी विद्यानिकेतन येथे “ग्रँड पेरेंट्स डे” ही आगळीवेगळी संकल्पना साकार - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 20 February 2020

कर्मयोगी विद्यानिकेतन येथे “ग्रँड पेरेंट्स डे” ही आगळीवेगळी संकल्पना साकार

 

Pandharpur Live-
मंगळवार दिनांक 18/02/2020 रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये ग्रँड पेरेंट्स डे ही संकल्पना साकार झाली. जगाची एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल सुरू असताना माणूस हा भौतिक सुविधा व तंत्रज्ञानामध्ये गुंतला आहे, परंतु या सर्वांचे मार्गदर्शक व खंबीर आधार हा अडगळ म्हणून आपण समजत आहोत. ज्यांच्या आधाराने नातू चालायला शिकतो तेच आपले आजी आजोबा, यांच्याकडे आपण त्यांच्या बोलण्यातील काळजी व प्रेम समजून न घेता आपण दुर्लक्ष करतो अशा या गोष्टीचे महत्त्व सांगण्यासाठी प्रशालेच्या प्राचार्य सौ शैला कर्णेकर यांनी गेल्या या दोन वर्षापासून “ग्रँड पेरेंट्स डे” च्या माध्यमातून आजी-आजोबा हे प्रत्येक कुटुंबासाठी किती महत्त्वाचे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या कलाकृतींमधून सादर केला.

याप्रसंगी श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे आधारस्तंभ व पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख माजी आमदार सुधाकरपंत परिचारक साहेब यांना प्रमुख पाहुणे म्हणून तर श्री दाजी भुसनर सर, श्री बाळासाहेब थोपटे आदी मान्यवर आमंत्रित होते. याप्रसंगी प्रशाले मधील विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला व या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. व हळव्या मनाच्या आजी-आजोबांना फुंकर घालण्याचे काम कर्मयोगी विद्यानिकेत च्या शिक्षक वृंदांनी आपल्या कलेतून केले. याप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर यांनी आपल्या सुमधुर आवाजातून गायन सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्याचबरोबर श्री मंगेश भोसले सरांनी जादूचे प्रयोग सादर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचप्रमाणे श्री राहुल काळे, पल्लवी दशरत किरण गोरे, प्रदीप नागरगोजे, अश्विनी चव्हाण यांनी आपल्या नाटकातून आजी-आजोबांची व्यथा मांडली. आपल्या गाण्याने सर्वांना सुधीर भोरकर, योगिनी ताठे, विद्या जाधव, वर्षा पवार यांनी वातावरण सुरमय केले.अमोल डुणे, गहिनीनाथ कचरे या प्राध्यापकांनी आपल्या आवाजातील वैविध्यता दाखवत नकला सादर केल्या. त्याचबरोबर सौ संध्या जाधव यांनी कुटुंब व आजोबा यांचे महत्त्व कवितेतून सादर केले व दिगंबर मिसाळ यांनी शायरी म्हणत कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी वातावरण संगीतमय करत चित्रकला शिक्षक श्री नारायण कुलकर्णी यांनी सर्वांना गिटार ची धुन ऐकवली तसेच सर्वांचे मन मोहण्यासाठी बाल चमूने नृत्य सादर केले.

या कार्यक्रमासाठी पल्लवी दशरथ यांनी या कार्यक्रमाचे सुंदर समालोचन केले. हे सर्व आदरातिथ्य पाहून आलेले आजोबा भारावून गेले. त्याच बरोबर कुटुंब प्रमुख म्हणून माननीय श्री सुधाकरपंत परिचारक साहेबांनी शब्दरूपी विश्वासाचा हात सर्वांच्या पाठीवर ठेवला. या कार्यक्रमासाठी सर्वांनीच प्रशालेचे आभार मानले यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार श्री प्रशांत परिचारक साहेब यांची मोलाची साथ लाभली. त्याचबरोबर प्राचार्या सौ शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांचे मार्गदर्शन लाभले व ऑफिस इन्चार्ज श्री राजेंद्र सावंत यांनी योग्य असे नियोजन केले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

add