पळून गेलेल्या मुलीच्या वडिलांनी जीवंत मुलीस बॅनर लावून वाहिली श्रध्दांजली... 'स्वर्गवासी' , 'विश्वासघातकी' असा केला तिचा उल्लेख!


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
कोल्हापुरात घरातून पळून गेलेल्या मुलीविरोधात वडिलांनीच बॅनर लावून तिला स्वर्गवासी जाहीर केलं आहे. तिला श्रद्धांजली वाहणारे बॅनर या मुलीच्या वडिलांनी लावले आहेत. कोल्हापुरातल्या एका गावातल्या घरातली ही मुलगी घरातून पळून गेली आहे. ही बाब तिच्या घरातल्यांना समजल्यानंतर ते चांगलेच संतापले. या मुलीच्या वडिलांनी मुलीला श्रद्धांजली वाहणारे बॅनर लावून तिला कैलासवासी जाहीर केलं आहे. मुलगी घरातून पळून गेल्याने बेअब्रू झाल्याची भावना मुलीच्या कुटुंबीयांमध्ये आहे. त्यातूनच हे फलक लावण्यात आले आणि काही वेळाने काढण्यात आले.
काय म्हटलं आहे या फलकांमध्ये?
'श्रद्धांजली' असं नाव देऊन पळून गेलेल्या मुलीचा फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे.
तिच्या फोटो खाली कै. असा उल्लेख करुन तिचे नाव लिहिण्यात आले आहे. विश्वासघातकी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर उजव्या बाजूला शोकाकुल आत्मक्लेश असं नाव देऊन एक संदेश लिहिण्यात आला आहे. बाळ तू जन्माला येतानाच आईला संधीवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस.. त्या वेदना सहन करीत ज्या आईने तुझे सर्व हट्ट, लाड, पुरवित मोठे केले ती दुर्दैवी आई. तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे तिने जपलं. पण यापुढील तुझ्या आयुष्यात आनंद सुख देण्यास असमर्थ ठरला म्हणून तू सोडून गेलीस हा काळा दिवस पाहण्यासाठी जिवंत असलेला असा कमनशिबी बाप. असा मजकूर या बोर्डवर लिहिण्यात आला आहे. तसेच एका लाल पट्टीत बोध असे लिहून त्यापुढेही एक मजकूर लिहण्यात आला आहे. 

हे वाचून अशा वागणाऱ्या मुलींच्या मनाचे परिवर्तन होऊन आपल्या आई वडिलांचा विश्वासघात करणार नाहीत ही अपेक्षा.. असंही यामध्ये म्हटलं आहे. मुलीच्या फोटोवर काळ्या रंगात काटही मारण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वीच मुलगी घरातून पळून गेली आणि तिने दुसऱ्या जातीच्या मुलाशी विवाह केल्याची बाब समोर आल्याने गडचिरोलीतल्या कुटुंबानेच विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली होती. आता कोल्हापुरात पळून गेलेली मुलगी आपल्यासाठी मेली असे बॅनर तिच्या वडिलांनी लावले आहेत. या बॅनरची चर्चा झाली. त्यानंतर हे बॅनर उतरवण्यात आले असंही समजतं आहे. या मुलीचे वडील हे घडल्या प्रकाराबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. त्यांनी बॅनर लावूनच त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.