माळढोक अभयारण्य क्षेत्र सीमा निश्चित... उद्योगवाढीचा मार्ग मोकळा! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 14 February 2020

माळढोक अभयारण्य क्षेत्र सीमा निश्चित... उद्योगवाढीचा मार्ग मोकळा!


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्याच्या संवदेनशील क्षेत्राची सीमा निश्चिती अखेर झाली आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची अधिसूचना अखेर जाहीर केली आहे.

याबाबत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे आता सोलापूर, अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाचा आणि उद्योगवाढीचा अडथळा दूर झाल्याच्या प्रतिक्रिया उद्योजकांकडून व्यक्त होत आहेत. यासाठी 14 जानेवारी 2019 रोजी अधिसूचना काढून त्यावर तज्ज्ञांचे आणि सर्वसामान्य लोकांचे आक्षेप मागविण्यात आले होते.

त्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर आलेल्या सूचना आणि आक्षेपाचा विचार करुन महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात आढळून येणार्‍या माळढोक पक्षाचे आर्थिक, औषधी आणि नैसर्गिक महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी 366.72 चौरस किमी क्षेत्रफळ माळढोक अभयारण्य म्हणून निश्चित करण्यात आले असल्याचे या अधिसूचनेत म्हटले आहे.

माळढोक अभयारण्यातील संवेदनशील परिक्षेत्राची निश्चिती नव्याने करण्यात यावी, अशी मागणी दोन जिल्ह्यातील उद्योजकांसह सर्वसामान्य शेतकर्‍यांनीही केली होती. माळढोक अभयारण्याबाबत यापूर्वी 2016 यावर्षी केंद्राने अधिसूचना जाहीर केली होती. त्यामध्ये अभयारण्याच्या सीमेपासून किमान दहा किलोमीटर अंतरावर कोणत्याही प्रकारच्या विकासाची कामे, उद्योग, व्यवसाय अथवा बांधकामे करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. तसेच त्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी या भागातील शेतीच्या खरेदी विक्रीवरही निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा आणि करमाळा तालुक्यातील विकासाला मोठा अडथळा निर्माण झाला होता. तसेच रस्ते, शेती सिंचनाचे कॅनॉल आणि उद्योगवाढीलाही या भागात मोठा ब्रेक लागला होता. त्यामुळे विविध राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्‍यांनी माळढोक अभयारण्याबाबत संवेदनशील केलेले क्षेत्र कमी करावे, अशी मागणी वारंवार शासनाकडे लावून धरली होती.त्यासाठी अनेकवेळा मोर्चे आणि आंदोलनेही करण्यात आली.

यावर केंद्रशासनाने निर्णय घेतला असून केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील संवेदनशील क्षेत्र निश्चित नसल्याने अनेक उद्योजकांना परवाने मिळाले नाहीत. अनेक उद्योजकांनी बेकायदेशीर बांधकामे केली होती. त्यावर गंडातर येणार होते. नव्याने संवेदनशील क्षेत्र निश्चित व्हावे, यासाठी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे बैठका झाल्या होत्या. 11 फेब्रुवारी रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अधिसूचना जाहीर केली आहे. यात सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात सहा तालुक्यांतील क्षेत्रांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील १४४ गावांचा समावेश
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा व करमाळा या पाच तालुक्यातील जवळपास 144 गावांचा समावेश या माळढोक अभयारण्यात होता. त्यामुळे अभयारण्यापासून किमान 10 किलोमीटर अंतरावर कोणतेही विकासकाम, बांधकाम, उद्योग, व्यवसाय, खाणी असे व्यवसाय करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. आता अभयारण्य जाहीर असलेल्या क्षेत्रापासून 0 ते 400 मीटर अंतरापर्यंतच हे निर्बंध राहणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्याच्या विकासाला आता चालना मिळणार आहे.

add