माळशिरस मधील समाधी स्मारकाचे गुढ उकलले !

समाधी स्मारके महादजी व शिवकन्या सखुबाईंचेच असल्याचे ग.भा.मेहेंदळे व ञ्यं.शं.शेजवलकरांच्या संशोधनातून स्पष्ट.
पंढरपूर :- अकलुज माळशिरस मधील ओढ्याच्या काठावर असलेले जोड समाधी स्मारक हे छञपती शिवाजी महाराजांचे जावाई व कन्या महादजी व सखुबाई निंबबाळकरांचेच असल्याचे जेष्ठ इतिहास संशोधक ग.भा.मेहेंदळे व ञ्यं.शं.शेजवलकरांच्या संशोधकातून सिद्ध झालेले आहे.या बाबत अधिक माहिती अशी की,या जोड समाधी स्मारकाबद्दल काही दिवसापुर्वी विविध वृत्तपञातून सदर स्मारकासंदर्भात काही दावे सांगणारे वृत्त प्रकाशित झालेले होते.त्यामुळे सदर स्मारकांबद्दल लोकांच्या व इतिहास संशोधकांच्या मनामध्ये कुतुहल निर्माण झालेले होते.
या विषयासंदर्भात पंढरपूर येथिल सत्यशोधक इतिहास संशोधक मंडळाचे संस्थापक अमरजित पाटील यांनी अधिक माहिती देताना सदर समाधी स्मारके ही छञपती शिवाजी महाराजांचे जावाई महादजी निंबाळकर व त्यांची पत्नी शिवकन्या सखुबाई निंबाळकर यांचे असल्याचे जेष्ठ इतिहास संशोधक ग.भा.मेहेंदळे व ञ्यं.शं.शेजवलकर यांच्या संशोधनाच्या आधारे स्पष्ट केलेले आहे.

वास्तविक या जोड स्मारकाबद्दल नव्याने केल्या जाणार्‍या दाव्यांसंदर्भात,दावा करणार्‍यांकडून ठोस असे ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे समोर ठेवण्यात आलेले नाहीत.महादजी नाईक निंबाळकर हे ग्वाल्हेर मध्ये मृत्यु पावले असल्याचा दावा करणार्‍यांकडून,महादजींच्या ग्वाल्हेर मधील महादजींच्या कथित समाधीचे छायाचिञ अथवा सदर समाधी नेमकी कुठे आहे ? या संदर्भात कोणताही ऐतिहासिक संदर्भ पुरावा देण्यात आलेला नाही.तसेच,जर महादजी हे ग्वाल्हेर मध्ये मृत्यु पावले असतील तर आणि त्यांच्या पत्नी सखुबाई या सती गेल्या असतील तर त्यांचे सती स्मारक फलटण येथे कसे काय ? याबाबत ही पुरेसा खुलासा करण्यात आलेला नाही.तसेच,सखुबाईंचे फलटणमधील स्मारक म्हणून दाखवले जाणार्‍या वास्तुवरील लिखानाचे सुलभ मराठी भाषांतर ही सादर केलेले नाही.त्यामुळे सदर स्मारकाच्या सत्यतेबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.तसेच,माळशिरसमधील जोड स्मारके सरदार वाघमोडे यांची असल्याची शक्यता वर्तवणार्‍याकडून ती नेमकी कोणत्या सरदार वाघमोडेची असावीत.तसेच,त्या सरदार वाघमोडेच्या कुठल्याही लढाईचा अथवा मृत्युच्या कारणांचा संदर्भ पुरावा देण्यात आलेला नाही.

याउलट सदर जोड स्मारकाबद्दल ञ्यं.शं.शेजवलकर यांनी सन १९६४ मध्येच मराठा मंदिर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या श्री शिवछञपती,संकल्पीत,शिवचरिञाची प्रस्तावना,आराखडा व साधने मध्ये व ग.भा.मेहेंदळे यांनी १९९६ मध्ये प्रकाशित केलेल्या राजा शिवछञपती खंड १ ,भाग १ मध्ये याबाबत पुराव्यानिशी मांडणी केलेली आहे.या जोड समाधी स्मारकाबद्दलची उभयतांची मते पुढिल प्रमाणे आहेत.ग.भा.मेहेंदळे यांनी,"अकलुजच्या किल्ल्यास घातलेला वेढा उठवून बजाजी परत फलटणच्या वाटेवर असताना वाटेवर महादजी नाईक चकमकीत मारले गेले.बजाजी हे फलटणचे अधिपती होते." या प्रमाणे संशोधन मांडलेले आहे.तसेच,ञ्यं.शं.शेजवलकर यांनी ही,"महादजी नाईक मोगलांचे चार हजारी मनसबदार होते.त्यांची समाधी अकलुज माळशिरस रस्त्यावर माळशिरस गावालगत असलेल्या ओढ्याकाठी आहे.ही जोड समाधी आहे." अशा प्रकारे सविस्तरपणे सदर समाधीच्या बारकाव्यासह नोंद आपल्या संशोधकातून पुढे आणलेली आहे.

त्यामुळे सदर समाधी स्मारकांबद्दल लोकांच्या व इतिहास संशोधकाच्या मधील संभ्रम दुर होण्यास मदत झाली असून,सदर समाधी स्मारके महादजी निंबाळकर व शिवकन्या सखुबाई निंबाळकरांचीच असल्याचे निर्विवादपणे स्पष्ट झालेले आहे.
- अमरजित पाटील.
संस्थापक,सत्यशोधक इतिहास संशोधन मंडळ,पंढरपूर.