भिमज्योत सांस्कृतीक मंडळ- माता रमाई जयंतीनिमित्त जेष्ठ महिला-भगिणींच्या हस्ते केले रमाईंच्या प्रतिमेचे पुजनपंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर येथील भीमज्योत सांस्कृतीक-शैक्षणीक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने माता रमाई यांची जयंती विविध उपक्रम राबवुन साजरी करण्यात आली. पंढरीतील 197/ब, बौध्द नगर येथील अनेक माता-भगिणींना या निमित्ताने सन्मानीत करण्यात आले. उपस्थित सर्व महिलांना कुंकवाचे करंडे भेटस्वरुपात देण्यात आले. सर्व माता-भगिणींच्या हस्ते त्रिसरण व पंचशीलाचे वाचन करण्यात आले. माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. यासह अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशोर दंदाडे यांनी दिली.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रेरणादायी ठरेल असं मौलीक काम जर कोणी केलं असेल तर ते माता रमाई यांनी केलेलं आहे. माता रमाई यांनी महामानव डॉ. बाबासाहेब यांच्या प्रवाहाविरुध्दच्या व समाजाच्या हितासाठीच्या लढयात आपल्या प्रापंचिक अडी-अडचणी येवु दिल्या नाहीत. तर कायमच त्या बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. 1913 साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. इ.स. 1914 ते 1917 साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट 1917 मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. इ.स. 1921 बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. 1926 मध्ये राजरत्नचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणार्‍या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्‍या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री 8.00 नंतर गोवर्‍या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.

अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून 18-18 तास अभ्यास करु लागले. त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या. ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपर्‍यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते. रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली. असं त्यांचं कार्य व त्यांनी केलेला त्याग हा आजच्या युगातील प्रत्येक माता-भगिणींसाठी प्रेरक आणि स्फुर्तीदायक ठरणारा आहे. यासाठी आपण सर्वांनी माता रमाईचा इतिहास व त्यांचं कार्य जाणुन घेणं. अत्यावश्यक आहे. असं मत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशोर दंदाडे यांनी यावेळी व्यक्त केलं.

या कार्यक्रमास रमाई महिला मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांसह सतुबाई वाघमारे, कल्पना गायकवाड, शोभा ढवळे, शोभा शिंदे, केराबाई धनवजीर, मंगल दंदाडे, विठाबाई दंदाडे, शोभा धनवडे, कविता दंदाडे, वैशाली बनसोडे, मंंदा वाघमारे, अश्‍विनी खरे, रंजना बंगाळे, आशाा कांबळे, शितल दंदाडे, पुजा दंदाडे, संजाबाई शेवडे, संगीता पोळके, अविंदा धनवजीर, काजल वाघमारे, सुनीता वाघमारे, सीमा वाघमारे, पवित्रा दंदाडे, सुनीता ढवळे, मंगल क्षीरसागर, कमल वाघमारे, विजया खरे, अनिता साबळे, सायरा बंगाळे, केशर दंदाडे, सोजाबाई धनवजीर, माया दंदाडे, मच्छिगंधा बंगाळे, सीमा ओहाळ आदी महिलांसह, जेष्ठ मंडळी, युवक, युवती व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.