महाराष्ट्रातील पहिली “ निमंत्रित दाम्पत्यांची उखाणे स्पर्धा ” पंढरपूर येथे संपन्न... श्री. व सौ. सविता रवि सोनार स्नेह परिवाराचा अनोखा उपक्रम... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 28 February 2020

महाराष्ट्रातील पहिली “ निमंत्रित दाम्पत्यांची उखाणे स्पर्धा ” पंढरपूर येथे संपन्न... श्री. व सौ. सविता रवि सोनार स्नेह परिवाराचा अनोखा उपक्रम...

विश्वविक्रमवीर कवी श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या औचित्याने “ निमंत्रित दाम्पत्यांची उखाणे स्पर्धा ” या कार्यक्रमादरम्यान पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे व सौ. अंजली भगवान वानखेडे यांनी सोनार दांपत्यास पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
Pandharpur Live-
पंढरपूर (प्रतिनिधी) :- आधुनिक जीवनशैलीत विवाह समारंभ आणि विविध सण समारंभ प्रसंगी विवाहित स्त्री आणि पुरुषांकडून पारंपरिक उखाणे घेण्याची परंपरा कमी होत चालली असताना येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी श्री. व सौ. सविता रवि सोनार यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या औचित्याने “ निमंत्रित दाम्पत्यांची उखाणे स्पर्धा ” आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रभरातील माहेरवाशीण व पंढरपूर येथील सासुरवाशीण असणाऱ्या सुमारे पंचवीस सवाष्ण महिलांनी त्यांच्या पतिराजांसोबत या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. या नाविन्यपूर्ण स्पर्धेच्या वेळी अनेक दाम्पत्यांनी “ सखा-सखी हर्षोल्हास मंच ” वर उपस्थित राहून माहेर आणि सासर यांच्या नाव व गावाचा उल्लेख करत, विविध नातेसंबंधांचा उलगडा करत, वैविध्यपूर्ण गोष्टींची गुंफण करत वैशिष्ट्यपूर्ण उखाणे सादर केले.
 श्री. व सौ. सविता रवि सोनार या सखा-सखीचा एक अविष्मरणीय क्षण.          श्री. व सौ. सविता रवि सोनार स्नेह परिवाराच्या वतीने आयोजित या निमंत्रित दाम्पत्यांची उखाणे स्पर्धेत श्री. व सौ. अंजली सचिन लादे हे दाम्पत्य पहिले “ उखाणे रत्न सखा-सखी ” ठरले. त्यांना श्री. व सौ. प्रमिला धनाजीराव देशमुख, श्री. व सौ. जयश्री राजेंद्र सुर्यवंशी आणि श्री. व सौ. सविता रवि सोनार या मान्यवरांच्या शुभहस्ते आणि प्रमुख उपस्थितीत मखमली टोपी, शाल, पुष्पगुच्छ, सफारी आणि मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.

          तसेच श्री. व सौ. मैत्रेयी मंदार केसकर यांना द्वितीय, श्री. व सौ. मनीषा सचिन कुलकर्णी यांना तृतीय तर श्री. व सौ. मनीषा राजेंद्र भोसले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या निमंत्रित दाम्पत्यांच्या उखाणे स्पर्धेसाठी श्री. व सौ. रत्नप्रभा चांगदेव पाटील, श्री. व सौ. आशा अरुण पाटील आणि श्री. व सौ. शोभा भारत माळवे या तीन दाम्पत्यांनी स्पर्धक दाम्पत्यांचे मंचावरील प्रवेश, वावर, पेहराव रंगसंगती, उखाणा लयबद्धता, नाविन्यपूर्णता, सासर माहेर उल्लेख आणि उपस्थित रसिक श्रोत्यांचा प्रतिसाद या बाबींचे सखोल निरिक्षण करुन गुणांकण करत परिक्षण केले. 
पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांना बेस्ट न्यू सिंगर म्हणून सन्मानीत करण्यात आले.
          या नाविन्यपूर्ण स्पर्धवेळी “ सखा-सखी हर्षोल्हास मंच ” चे उद्घाटन श्री. व सौ. नम्रता अनिल सोनार या दाम्पत्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर स्पर्धेचा शुभारंभ नाविन्यपूर्ण पद्धतीने मान्यवर दाम्पत्यांच्या शुभहस्ते फुलदाणीमध्ये गुलाब पुष्प भरण करुन करण्यात आला. या निमंत्रित दाम्पत्यांच्या उखाणे स्पर्धेप्रसंगी श्री. व सौ. शर्मिला मिलिंद देशपांडे या दाम्पत्यांस सर्वोत्तम रंगसाधर्म्यी पेहेराव (बेस्ट मॅचिंग), श्री. व सौ. रेखा सतीश चंद्रराव या दाम्पत्यांस सर्वोत्तम लडिवाळ (बेस्ट रोमँटिक) श्री. व सौ. अंजली भगवान वानखेडे या दाम्पत्यांस सर्वोत्तम नवोदित गायक (बेस्ट न्यू सिंगर) तर श्री. व सौ. सुनिता राजेश कदम या दाम्पत्यांस सर्वोत्तम पारंपरिक वेशभूषा (बेस्ट ट्रॅडीशनल कॉश्च्यूम) असे संसारोपयोगी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.


उखाणे घेताना श्री.व.सौ.वानखेडे दांपत्य
            अशा या अनोख्या समारंभ प्रसंगी श्री. व सौ. स्वाती ज्ञानेश्वर मोरे, श्री. व सौ. सुप्रिया संदेश सोनार तसेच इतर दाम्पत्यांनी सुश्राव्य आणि सुमधूर अशी सदाबहार प्रेमगीते सादर केली. काही दाम्पत्यांनी शेर शायरी तर काही दाम्पत्यांनी प्रेम कविता सादर केल्या. तर पंचवीस स्पर्धकांव्यतिरीक्त जवळपास सर्वच उपस्थित दाम्पत्यांनी उस्फूर्तपणे उखाणे सादर केले. 

          अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या निमंत्रित दाम्पत्यांच्या उखाण्यांच्या स्पर्धेचे प्रास्ताविक श्री. व सौ. माधुरी प्रतापसिंह चव्हाण या दाम्पत्यांनी केले. नेटके तसेच खुमासदार सुत्रसंचलन श्री. व सौ. मैत्रेयी मंदार केसकर या दाम्पत्यांनी केले. श्री. व सौ. प्रियांका प्रशांत पाटील यांनी उपस्थित निमंत्रित दाम्पत्यांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. व सौ. सविता रवि सोनार स्नेह परिवाराच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

add