दगड धोंड्यांच्या माळरानावर फुलली वनराई


Pandharpur Live-
  • वनीकरण विभागाने घनवृक्ष योजनेतून पाच एकरात केली साठ हजार वृक्षांची लागवड
  • 60 प्रजातींची झाडे;उत्कृष्ठ नियोजनाने पाच महिन्यात सात फुटापर्यंत वाढ
परळी (प्रतिनिधी)
 एखाद्या विभागातील अधिकार्यांनी खात्याअंतर्गत योजना प्रभावीपणे राबविली तर ती योजना फलदायी होते.प्रादेशिक वनीकरण विभागाच्या परळी परिक्षेत्रातील अधिकार्यांनी अशीच एक योजना हाती घेतली.डोंगरमाथ्यावरील दगड-गोट्यांनी भरलेल्या खडकाळ जमीनीवर आत्तापर्यंत फक्त पावसाळ्यात खुरटे गवत उगवायचे त्या माळरानावर  घनवृक्ष लागवड योजनेतून परळी तालुक्यात दोन ठिकाणी प्रत्येकी एका हेक्टरवर 30 हजार झाडांची लागवड करत उत्कृष्ठ संगोपन केल्याने हे डोंगरमाथे हिरवाईने नटले आहेत.देशी- विदेशी प्रजातींच्या या वृक्षवल्लीमुळे हे डोंगरमाथे पिकनिक पॉईंट बनत आहेत.   

 परळी तालुक्यात वनविभागाची शेकडो हेक्टर जमीन आहे.दगडगोट्यांनी व्यापलेल्या या खडकाळ जमीनीवर फक्त पावसाळ्यात गवत असते बाकी आठ महिने हे डोंगरमाथे उजाड असतात.प्रादेशिक वनीकरण बीड विभागाच्या विभागीय वन अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली परळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.बी.शिंदे,वनपाल कस्तुरे,वनरक्षक दौंड यांनी या माळरानावर हिरवाई पुरविण्याचा प्रयोग हाती घेतला कन्हेरवाडी शिवारातील शिवेवरचा मारुती जवळ असलेल्या एक हेक्टर व परळी (वसंतनगर) शिवारातील फॉरेस्ट स.न.478 मधील एका हेक्टरची निवड करुन शासनाच्या घनवृक्ष लागवड योजनेतून वनराई फुलविण्याचे काम हाती घेतले.गतवर्षी उन्हाळ्यात या जमीनीवरील दगड,धोंडे बाजुला काढुन एक मीटर जमीन खोदली जुन महिन्यात जमीन रोप लागवडीसाठी तयार केल्यानंतर जुलै,ऑगस्ट महिन्यात प्रति चौरस मीटरमध्ये तीन रोपे या प्रमाणे एका हेक्टरमध्ये 30 हजार रोपांची लागवड केली,शेनखत व सेंद्रिय पदार्थांचा वापर करत कन्हेरवाडी व वसंतनगर तांडा येथील माळरानावर हिरवाई फुलविली.केवळ वृक्ष लागवड करुन न थांबता या रोपांचे संगोपन करण्याचे नियोजन केले गेले.

शेजारील ओढ्यातुन वाहुन जाणार्या पाण्यावर मोटार टाकुन 700 मिटर पाईपलाईन केली व तेथेच बाजुला विंधनविहीर घेवुन ते पाणी ठिबक सिंचनाद्वारे या रोपांना देण्यात येत आहे. कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खते व औषधांचा वापर न करता दर आठ ते पंधरा दिवसानंतर गावरान गायीचे गोमुत्र,सडलेले ताक, दशपर्णीचे मिश्रण तयार करुन सीपीपी पध्दतीचा वापर करुन फवारणी केली जाते.या सुयोग्य नियोजनामुळे अवघ्या पाच महिन्यात ही रोपे पाच ते सात फुटापर्यंत वाढलेली आहेत.उजाड झालेल्या या डोंगरमाथ्यावर सध्या ही वनराई वाळवंटात दिसणार्या हिरवळीसारखी दिसत आहे.

साठ प्रजातींची वृक्षलागवड
 वसंतनगर व कन्हेरवाडी येथील घनवृक्ष वाटीकेत कडुलिंब,वड,पिंपळ,उंबर,अवना,बेहडा,बाबळा,लक्ष्मीतरु,आंबा,आवळा,चिंच,सागवान,बदाम आदी 60 प्रकारच्या देशी,विदेशी वृक्षांची लागवड केलेली आहे.उत्कृष्ठ संगोपनामुळे अवघ्या एका वर्षात या ठिकाणी घनदाट जंगल पहावयास मिळणार आहे.

55 लाख लिटर चे शेततळे 
वसंतनगर तांडा शिवारातील  या एक हेक्टरवरील रोपवन क्षेत्रातील रोपांना उन्हाळ्यात पाणी कमी पडु नये यासाठी संपुर्ण जमीनीवर पाचट व वाळलेल्या गवताचे आच्छादन टाकले असुन शेजारीच 55 लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारून यात पाणी साठविण्यात आले आहे.हरिण व रानडुकरापासुन नुकसान होवु नये यासाठी या संपुर्ण रोपवनास तारेचे कुंपण टाकण्यात आले आहे.    

शाळा महाविद्यालयांसाठी नंदनवन
शाळा व महाविद्यालयातील अनेक सहली या दुरवर कुठेतरी आयोजीत केल्या जातात.परळी वनीकरण विभागाने अगदी जवळच माळरानावर नंदनवन फुलविले असुन पर्यावरण संरक्षणाच्या व घनदाट जंगलांचा अनुभव घेण्यासाठी यासारखे दुसरे ठिकाण नाही.याठिकाणी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व जोपासणा कशी असते याचे शिक्षण मिळेल.परळी व परिसरातील शाळा- महाविद्यालयाबरोबरच प्रत्येक नागरीकांसाठी हे नंदनवन असुन वनीकरण विभागातील अधिकार्यांनी सेंद्रिय पध्दतीने निर्मित केलेल्या या वृक्षलागवडीने पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मोलाची मदत होईल. 
 - डॉ.संतोष मुंडे 
सामाजीक कार्यकर्ते,परळी