रवि सोनार यांना ' कलासाधना विशेष गुणवत्ता पुरस्कार ' जाहीर


PANDHARPUR LIVE-
पंढरपूर (प्रतिनिधी) :- केवळ पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रात अल्पावधीत कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, लावणी, गौळण, द्विपदी, क्षणिका, हायकू, चारोळी, प्रश्नांतिक त्रिवेणी अशा वैविध्यपूर्ण साहित्य लेखन व साहित्यिक उपक्रम राबविताना विशेष उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांना पंढरपूर येथील ' कलासाधना सांस्कृतिक मंडळ ' यांच्या वतीने ' विशेष गुणवत्ता पुरस्कार ' जाहीर करण्यात आला आहे.
          साहित्य क्षेत्रात सामुदायिक पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन, हायकूकार शिरीषताई पै यांच्या जन्म दिनाच्या औचित्याने प्रतिवर्षी भारतीय मराठी हायकू दिवसाची सुरुवात, नौकाविहार कविसंमेलन, अनेक नवोदित कवी व कवयित्रींच्या संग्रहांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना तसेच संक्षिप्त शब्दांत मलपृष्ठ स्फूट, पुस्तकांचे गाव असणाऱ्या भिलार येथे शासनाच्या वाचनध्यास उपक्रमात सहभाग, आकाशवाणी व दूरचित्रवाणीवर कविता सादरीकरण, सण-उत्सव; वाढदिवस; विविध विशेष दिवसाच्या निमित्ताने आजपर्यंत सुमारे तीन हजारांहून अधिक पुस्तकांची स्नेहभेट, महाराष्ट्रात विविध शाळा व महाविद्यालयातून संपन्न झालेले ' मायचं मातृत्व, बा चं पितृत्व ' या आई-वडिलांवरील कवितांचे यशस्वी कार्यक्रम अशा वैशिष्ट्यपूर्ण कार्यामुळे वेगळा ठसा उमटवणारे कवी रवि सोनार हे सध्या महाराष्ट्रातील ओसाड माळरानावर तसेच ओस आणि  रुक्ष रस्त्याच्या दुतर्फा भारतीय वृक्षांच्या बीजांचे लाखो बीजगोळे पसरवण्याचा संकल्प करुन कार्यमग्न झाले आहेत. कवी सोनार यांच्या उल्लेखनीय साहित्यिक उपक्रमाची दखल घेऊन त्यांना  ' कलासाधना सांस्कृतिक मंडळ ' यांच्या वतीने ' विशेष गुणवत्ता पुरस्कार ' सोमवार दिनांक १७ फेब्रुवारी, २०२० रोजी दि पंढरपूर अर्बन को - आॅप. बँकेच्या कर्मवीर सभागृहामध्ये सायंकाळी ०६.०० वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते आणि उपस्थितीत देण्यात येणार आहे.
          सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि सोनार यांना पंढरपूर आणि परिसरात ' कलासाधना सांस्कृतिक मंडळ ' यांचा मानाचा समजला जाणारा  ' विशेष गुणवत्ता पुरस्कार ' जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.