पंढरपूर- प्रांताधिकारी, मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची विशेष बैठक.. परदेशातून आलेल्या "त्या" 7 जणांचे स्वत:च्या घरातच अलगीकरण... गर्दी टाळा,स्वच्छता पाळा - प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 19 March 2020

पंढरपूर- प्रांताधिकारी, मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची विशेष बैठक.. परदेशातून आलेल्या "त्या" 7 जणांचे स्वत:च्या घरातच अलगीकरण... गर्दी टाळा,स्वच्छता पाळा - प्रांताधिकारी सचिन ढोले यांचे आवाहन

                 पंढरपूर लाईव्ह- परदेशातून आलेल्या पंढरपूर तालुक्यातील "त्या" 7 जणांचे अलगीकरण त्यांच्याच घरात केलेले असुन 14 दिवस दररोज त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. याबाबत त्यांच्यात कांही लक्षणे आढळून आल्यास त्यांचे स्क्रिनिंग करुन पुढील तपासणीसाठी त्यांना   सोलापूरला पाठविण्यात येणार असल्याची माहिती  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले व प्र. वैद्यकीय अधिक्षक  डॉ.केचे यांनी दिली. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपयायोजनेसाठी प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून  सुक्ष्म  नियोजन केले असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी  नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या आजाराला घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी आवश्यकता नसेल, तर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.  
            कोरोना विषाणूंच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर  येथे  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदिप केचे उपस्थित होते. यावेळी बोलताना  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले व प्र. वैद्यकीय अधिक्षक  डॉ.केचे म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रतिबधात्मक उपाययोजनेसाठी पंढरपूर शहरात व ग्रामीण भागात कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तालुक्यातील  गावांमध्ये संबंधित गावचे  ग्रामसेवक, आरोग्य सेवक व पोलीस पाटील यांचे संयुक्त पथक तयार केले  आहे. तसेच नगरपालिकेच्या 17 प्रभागामध्ये प्रत्येकी 4 जणांचे पथक तयार केले असून या पथकाच्या माध्यमातून सर्वेक्षण व जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच परदेशातून आलेल्या प्रवाश्याकडून ‘ए’ फॉर्म भरुन घेणार असून त्यामध्ये प्रवास संपूर्ण तपशिल आदीबाबत माहिती घेण्यात येणार आहे.
              यावेळी बोलताना प्रांताधिकारी  सचिन ढोले  म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सामुहिक संपर्क ज्या ठिकाणी निर्माण होईल अशा ठिकाणी स्वत:हून जाणे टाळावे. आवश्यकता असेल तरच नागरीकांनी घराबाहेर पडावे. आवश्यकता भासल्यास नगरपालिकेच्या संसर्गजन्य वार्ड व 65 एकर येथील एमटीडीसीच्या निवासी संकुलात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने  व नगरपालिकेने ‘कोरोना’  विषाणूंच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेबबात  व्यापक जनजागृती करावी, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबतच्या सूचनाही बैठकीत प्रांताधिकारी  ढोले यांनी दिल्या.


add