पंढरपूर - जीवनावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रत्येक गावांत ग्रामसमितीची स्थापना - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 24 March 2020

पंढरपूर - जीवनावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रत्येक गावांत ग्रामसमितीची स्थापना


              पंढरपूर -24- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी पुर्वेतयारी म्हणून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या संचार बंदीच्या कालावधीत ग्रामीण भागात जीवनाश्यक सेवा सुरळीत रहावी यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये ग्रामसमितीची स्थापना करण्यात येणार आहे.
            कोरोना विषाणूं संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबतचा आढावा बैठकीचे  पंचायत समिती पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीस उपजिल्हाधिकारी तथा पालकअधिकारी स्नेहल भोसले, प्रांतधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे,गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नायब तहसिलदार सुरेश तिटकारे, तालुका वैद्कीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे प्र.वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रदिप केचे, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. सरडे  उपस्थित होते.
            यावेळी उपजिल्हाधिकारी भोसले बोलताना म्हणाल्या, प्रत्येक गावांमध्ये ग्रामसमितीची स्थापना करण्यात येणार असून, या समिती मध्ये सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष,ग्रामसेवक,  तलाठी, आरोग्य सेवक, रेशन दुकानदार यांचा समावेश असणार आहे. या समितीने परदेशाहून व परजिल्ह्यातून आलेल्या नागरीकांची माहिती घ्यावी तसेच त्या नागरीकांचे होम क्वारंटाईन करावे. आवश्यकता भासल्यास आरोग्य तपासण्या करुन घ्याव्यात. संचार बंदीच्या कालावधीत नागरीकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा होईल तसेच सदर ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही उपजिल्हाधिकारी भोसले यांनी दिल्या.
            यावेळी प्रांतधिकारी सचिन ढोले बोलताना म्हणाले, जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार व साठेबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील कोणतेही औषध दुकाने बंद राहणार नाहीत. वैद्यकीय सुविधा देणाऱ्या डॉक्टरांनी दवाखाने बंद करु नयेत. दवाखाने बंद केल्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शहरी भागातील भाजीपाला विक्रेत्यांनी एकाच ठिकाणी न बसता नगरपरिषदेकडून  विविध ठिकाणी  वाटप करण्यात येणाऱ्या  जागेवर बसावे. यासाठी नगरपालिकेने भाजी विक्रेत्यांना ओळखपत्रे द्यावीत. कोरोनाचे  संकट हे मानव जातीवरील अस्तिवाचे संकट आहे असे समजून नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांतधिकारी ढोले यांनी केले.
            संचार बंदी लागू असून, संचार बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे, नागरीकांनी विनाकारण बाहेर पडू नये, वैद्यकीय सुविधा देणाऱ्या डॉक्टरांनी शक्यतो रुग्णांना औषधे एकाच ठिकाणी मिळतील याची दक्षता घ्यावी.असे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी सांगितले.
            कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी वेळोवेळी स्वच्छता व फवारणीचे काम शहरात  ठिकठिकाणी सुरु असल्याचे मुख्याधिकारी मानोरकर यांनी सांगितले. तालुक्यात परदेशाहून व परजिल्ह्यातून आलेल्या नागरीकांनी गुगल लिंकवरती आपली माहिती घरबसल्या भरावी असे गट विकास अधिकारी घोडके यांनी सांगितले. यावेळी  बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय सुविधेबाबत माहिती दिली.            

add