कोरोनाचा फैलाव... महाराष्ट्रात 193 तर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 च्या पुढे... सांगोला तालुक्यात 2 संशयित! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Sunday, 29 March 2020

कोरोनाचा फैलाव... महाराष्ट्रात 193 तर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 च्या पुढे... सांगोला तालुक्यात 2 संशयित!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-  महाराष्ट्रात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १९३ झाली आहे. कोरोना विषाणुचा वाढता फैलाव चिंतेचा विषय बनला असून रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1000 च्या पुढे पोहोचला होता. सांगोला तालुक्यातील दोन संशयित रूग्णांना पुढील उपचारासाठी सोलापूर ला पाठविले आहे. 

भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या देशभरातील रुग्णांची संख्या शनिवारी १००९ झाली. आतापर्यंत यापैकी २२ जणांचा मृत्यू ओढवला आहे. केरळमध्ये या विषाणूचा पहिला बळी शनिवारी नोंदविला गेला. गुजरातेत करोनामुळे एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला असून गुजरातमधील बळींची संख्या चार झाली आहे. भारतात आज (ता.२९) रविवारी सकाळपर्यंत करोनाच्या १००९ रुग्णांची नोंद झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

आतापर्यंत एकूण ९०३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत, तर ८४ रुग्ण हे पूर्णत: बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.


सांगोला तालुक्‍यातील कोरोनाचे दोन संशयित रुग्ण पुढील उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविले आहेत. कोरोनाच्या संशयित रुग्णामुळे सांगोला तालुक्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सांगोला तालुक्‍यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. पुण्याहून आलेल्या दोन कोरोना संशयित रुग्णांना आज पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहेत. सध्या तालुक्‍यात एक हजार 854 नागरिक अन्य ठिकाणाहून आले असून यापैकी तिघांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.


सांगलीच्या सीमा परिसरात भीतीचं वातावरण...
सांगली जिल्ह्यातून काही नागरिक चालत किंवा अन्य वाहनांतून तालुक्‍यात येत आहेत. त्यामुळे सीमा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 
  • पुण्यात आतापर्यंत 36 रुग्ण कोरोनाबाधित, त्यापैकी 10 संपूर्ण उपचारांनंतर घरी
  • पुण्यातील पाच रुग्णांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह. रविवारी मिळणार डिस्चार्ज
  • 275 हिंदुस्थानी नागरिक इराणवरून राजस्थान येथे दाखल. सर्वांना लष्कराच्या आरोग्य केंद्रात ठेवलं जाणार.
महाराष्ट्रात ७ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १९३ झाली आहे. सात रुग्णांपैकी ४ मुंबईतले तर पुणे, नागपूर आणि सांगली या तीन शहरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे.
करोनाचा प्रादुर्भाव हा संसर्गाद्वारे होतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि शक्यतो घराबाहेर पडू नका असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील करोनाबाबत किंवा इतर महत्त्वाच्या विषयांबाबत जेव्हा बैठका घेतात तेव्हा सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसतात.

add