महत्वाची बातमी- सोलापूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप बंद... ‘लॉकडाऊन’ 98% जनतेचा सहभाग; उर्वरीत 2% जनतेने ‘लॉकडाऊन’ गांभीर्याने घेणे आवश्यक- पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

पंढरपूर (प्रतिनिधी):- उद्यापासुन सोलापूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली. जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक करणारी वाहने वगळता पेट्रोल व डिझेलची विक्री उद्यापासुन बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या राज्यातील ‘लॉकडाऊन’ मध्ये 98 % लोक गांभीर्याने सहभागी झालेले आहेत. इतर 2 % लोकांनी गांभीर्याने घेतलेले नाही. कोरोना आजारावर अद्याप कोणताही उपचार नाही. लोकांनी घरात राहणं हाच उपाय आहे.  या 2% लोकांना रस्त्यावर येवु न देणं व जे याचं पालन करत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे सक्त आदेश पोलीसांना दिलेले आहेत.  अशी माहिती सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली. आज पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना श्री.पाटील म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत या 15-20 दिवसात आपल्यावरील जबाबदारी पार पाडायची आहे.  कायद्याचा कोणी भंग करताना  आढळले तर पत्रकारांनी व सामान्य जनतेनेही पोलिसांना यासंदर्भात माहिती द्यावी, माहिती कळविणाराचे नाव गुप्त ठेवले जाईल. किराणा मालाचा, अन्नधान्याचा कुठंही तुटवडा होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. यासाठी यासंबंधीच्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत. पंढरपूर तालुक्यात घरपोहोच किराणा माल व अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जाव्यात यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले व स्थानिक पोलिस निरक्षकांनी ‘घरपोहोच किराणा माल व अत्यावश्यक सुविधेची’  एक स्तुत्य संकल्पना मांडली आहे. हा प्रयोग सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम पंढरपूर तालुक्यात सुरु होत आहे. हे कौतुकास्पद आहे. जनतेला घरपोहोच किराणा माल व अत्यावश्यक सुविधा पुरविताना अधिकचे दर लावुन महाग वस्तु जर कोणी विकत असेल तर पोलीस प्रशासनाला यासंबंधी कळवावे. 

व्हॉटसअप, फेसबुक यावरुन प्रसारित होणार्‍या सर्व पोष्टवर आमचे बारीक लक्ष आहे. या माध्यमातुन जर कोणी अफवा पसरवित असेल तर त्यावर 100% गुन्हा दाखल केला जाईल. पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत लोकांची समिती प्रत्येक गावात नेमली आहे. त्यांचेकडून गावातील कोणी पुणे, मुंबई किंवा मोठ्या शहरातून आले असेल किंवा कायद्यचे उल्लंघण कुणाकडून होत असेल तर त्याची माहिती प्रशासनाला द्यावी अशी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती दिली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे आदी उपस्थित होते.