कोरोनाचा कहर... इटलीत 24 तासांमध्ये तब्बल 475 जणांचा मृत्यू... भारतातील रूग्णांची संख्या वाढली - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 19 March 2020

कोरोनाचा कहर... इटलीत 24 तासांमध्ये तब्बल 475 जणांचा मृत्यू... भारतातील रूग्णांची संख्या वाढली


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- चीनमधुन आलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर निर्माण केला असुन  इटलीमध्ये 24 तासांत तब्बल 475 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, 170 देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असून, बुधवारपर्यंत मृतांची संख्या 8790 वर गेली आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमधून सुरु झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता 170 देशांमध्ये पसरला आहे.
  • आतापर्यंत चीनमध्ये सर्वाधिक 3267 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर इटलीमध्ये 2978 जणांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत तब्बल 475 जणांचा बळी गेला. स्पेनमध्ये 623, फ्रान्स 175, अमेरिका 116, ब्रिटनमध्ये 71 जणांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये मृतांची संख्या 1135 वर गेली आहे.
  • कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू युरोपात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
  • जगभरात 24 तासांत 78766 नवीन रुग्ण दाखल झाले. त्यातील 6434 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यात युरोपातील संख्या जास्त आहे.
  • इटली, स्पेन, फ्रान्ससह संपूर्ण युरोपातील 27 देश शटडाऊन केले गेले आहेत.
भारतात रूग्णांची संख्या वाढली...
भारतात करोना बाधित रुग्णांची संख्या बुधवारी १५४ झाली असून विविध भागात सतरा नवीन रुग्ण सापडल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या रुग्णांमध्ये २५ परदेशी नागरिक असून आतापर्यंत दिल्ली, महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात प्रत्येकी एक बळी गेला आहे.

बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५७०० लोकांवर देखरेख केली जात आहे. दिल्लीत दहा रुग्ण सापडले असून त्यात एक परदेशी नागरिक आहे. उत्तर प्रदेशात एकूण १६ रुग्ण असून त्यात एक परदेशी नागरिक आहे. महाराष्ट्रात ४५ रुग्ण असून त्यात तीन परदेशी नागरिक आहेत. केरळात २७ रुग्ण असून त्यात दोन परदेशी नागरिक आहेत.

कर्नाटकात ११ रुग्ण असून लडाखमध्ये आठ, जम्मू काश्मीरमध्ये तीन तर तेलंगणात सहा रुग्ण आहेत.

तेलंगणातील रुग्णात दोन परदेशी नागरिक आहेत. राजस्थानात चार रुग्ण असून त्यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. 

हरयाणात १७ रुग्ण असून त्यात१४ परदेशी नागरिक आहेत. आतापर्यंत १४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यात तीन जण केरळातील आहेत.

 देशात करोनाने तीन बळी आतापर्यंत घेतले असून कर्नाटकात कलबुर्गी येथे ७६ वर्षांच्या सौदी अरेबियातून आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दिल्लीत एका वृद्धेचा, तर मुंबईत दुबईस प्रवास करून आलेल्या ६४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

 सरकारने अफगाणिस्तान, फिलिपाइन्स व मलेशियातून येणाऱ्या प्रवाशांना मंगळवारी बंदी घातली आहे. ३१ मार्चपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. तुर्कस्तान, ब्रिटन, युरोपीय देशातून येणाऱ्या प्रवाशांवर १८ मार्च ते ३१ मार्च दरम्यान बंदी घालण्यात आली आहे.

add