श्रीविठ्ठल साखर कारखान्याच्या भवितव्यासाठी सरसावले डॉ. बी. पी. रोंगे सर .. राजकारण बाजूला ठेवून विठ्ठल साखर कारखाना वाचविला पाहिजे हाच मुख्य हेतू -डॉ.बी.पी.रोंगे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 5 March 2020

श्रीविठ्ठल साखर कारखान्याच्या भवितव्यासाठी सरसावले डॉ. बी. पी. रोंगे सर .. राजकारण बाजूला ठेवून विठ्ठल साखर कारखाना वाचविला पाहिजे हाच मुख्य हेतू -डॉ.बी.पी.रोंगे

Pandharpur Live - 
पत्रकार परिषदेत मांडली श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 
दशा, दुर्दशा आणि दिशा

बंद पडलेल्या श्रीविठ्ठल साखर कारखान्याच्या भवितव्यासाठी डॉ. बी. रोंगे सर हे स्वत: सरसावले असुन आज पत्रकार भवनमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी खालीलप्रमाणे या कारखान्यासंदर्भातील अनैक बाबींवर प्रकाश टाकला.
पंढरपूर- ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी पंढरपूर परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आदरणीय संस्थापक अध्यक्ष कै. औदुंबरआण्णा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वप्नातील असलेला साखर कारखाना  ‘श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना” वेणूनगर, गुरसाळे (ता.पंढरपूर, जि.-सोलापूर)’ या नावाने वास्तवात आणला, स्वप्नपूर्ती केली गेली. परंतु आज तो बंद आहे. यामुळे शेतकरी, सभासद आणि कामगार यांची उपासमार होत असून एकेकाळच्या राजवाड्याची ही दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी राजकारण बाजूला ठेवून विठ्ठल साखर कारखाना वाचविला पाहिजे हाच मुख्य हेतू पुढे ठेवला आहे.’ असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले.
           
पंढरपूर शहरातील पत्रकार भवनमध्ये आयोजिलेल्या ‘पत्रकार परिषदे’त शिक्षणतज्ञ डॉ. बी.पी. रोंगे हे श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची दशा सांगून, झालेली दुर्दशा ऐकवली आणि त्यासाठी सुयोग्य दिशा देण्याकरता काय करावे लागेल ? याबाबत खुलासा करत होते. ते पुढे म्हणाले की, ‘आदरणीय संस्थापक अध्यक्ष कै. औदुंबरआण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या काटकसरीने व मेहनतीने साखर कारखाना उभा केला.

खूप चांगल्या पद्धतीने चालवला विस्तारीत केला. महाराष्ट्रात अव्वल दर्जाचा सुवर्णपदक विजेता महाराष्टात गणलेला हा साखर कारखाना शेतकरी कुटुंबाला वरदान ठरत होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर मध्ये सर्वात मोठी ठेव या कारखान्याने ठेवली होती. सदर बँक राजकीय दृष्ट्या त्यांच्या विरोधातील नेत्यांच्या प्रशासकीय ताब्यात असतानाही कोणताही किंतु परुंतु मनामध्ये न ठेवता फक्त शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून केलेली ती गुंतवणूक होती. शेतीसाठी पाईपलाईन, विहिर, शेळी पालन, पीक कर्ज इत्यादी बाबींसाठी वित्त पुरवठा करण्यासाठी सध्या विकलांग असणारी सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक त्यावेळी कार्यक्षमतेने चालत होती.श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ‘ठेवलेली ठेव’ हे एक त्या बँकेच्या इतिहासातील ‘सोनेरी पान’ होते असे म्हटले तरी वावगं होणार नाही. असा संपूर्ण सक्षम असणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना सन २०१९-२०
चा गळीत हंगाम चालू करू शकला नाही हे आपण सर्वजण उघड्या डोळ्याने पाहत आहोत. चाळीस वर्षाच्या कारखान्याच्या इतिहासात प्रथमच हा कारखाना बंद आहे. गळीत हंगाम सुरु करू शकला नाही हे तुमचे-आमचे
दुर्दैव आहे असे आम्हास वाटते. सध्याचे नेतृत्व हताशपणे मूळ प्रश्‍नाला बगल देण्याची भाषा वापरत आहे. सर्वात कहर म्हणजे हा कारखाना सुरू होणार की नाही हे वेळेत जाहीर न केल्यामुळे शेतात उभा ऊस पाहून अनेक शेतकरी हवालदील झालेले दिसून येत होते. पंढरपूर पंचक्रोशीमधील सर्व शेतकरी, कर्मचारी, व्यापारी, वाहनधारक या नेतृत्वामुळे डोळ्यात पाणी आणून जीवन जगत आहेत. ही अवस्था पाहणे तुमच्या व आमच्या नशिबी आले आहे.

कारखान्याचे कार्यक्षेत्र पहाता जास्तीत जास्त ऊसाचे क्षेत्र बैलगाडीने गाळपासाठी आणणे सहज शक्‍य असणारे २५ कि. मी. चे आतील क्षेत्र असतानाही कारखाना, सध्याच्या नेतृत्वाने बंद ठेवला आहे. आपल्या शेजारी
म्हसवड शहराजवळ एक कारखाना सक्षमपणे चालत आहे. त्या भागाची ओळख दुष्काळी म्हणून असल्याचे आपण जाणतो. विशेष म्हणजे को-जनरेशन प्रकल्प जोडीला नसताना व बैलगाडीने ओढता येईल असे क्षेत्र उपलब्ध नसतानाही कारखाना आपल्याकडचा ५०-७० कि. मी. अंतरावरून ऊस नेवून देखील चांगल्या पद्धतीने चालविला जातोय अन् विठ्ठल सहकारी साखरकारखाना चालू होऊ शकत नाही यामागचे गौडबंगाल काय आहे ? याचा शोध आपण सर्वांनी घ्यावा अशी इच्छा आहे. आम्ही आपणा सर्वांना यानिमित्ताने विनंती करीत आहोत की, लोकशाहीमध्ये चौथ्या स्तंभाचे आपण सर्वजण कार्यक्षम सदस्य आहात, याकामी आपले योगदान महत्वाचे आहे .

कारखान्याच्या सध्याच्या नेतृत्वाचे स्वतःच्या आमदारकीसाठीच कारखान्याकडे व त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे उसाच्या फडात असल्यासारखाच असलेल्या एकेकाळच्या राजवाड्याची ही दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी सभासदांना खाली मान घालून दुसऱ्याच्या दारात त्यांचा ऊस नेण्यासाठी उभे राहण्याची आणि कामगार व त्यांच्या कुटुंबावरती उपासमारीची वेळ आल्याचे पहावयास मिळते. पंढरपूरची अर्थ वाहिनी म्हणून पाहिला जाणारा हा कारखाना बंद राहिल्यामुळे पंढरपुरच्या अर्थ  व्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. सध्या कारखान्याचे वीज कनेक्शन देखील तोडले गेल्याचे समजते. कर्मचाऱ्यांना गेल्या ११ (अकरा) महिने पगारही मिळाला नाही. हे नेतृत्व स्वतःची कार्यक्षमता दाखविण्याऐवजी कधी राजकीय विरोधकांना तर अलीकडच्या काळात कधी सरकारला, कामगारांना, संचालकांना तर कधी सभासदांना दोष देण्याचा प्रयत्न करत वस्तुस्थितीपासून पळ काढत आहे व रेटून खोटे बोलून वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. परंतु दुर्दैवाने त्यांना शेतकरी, कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यात येणारे वेदनांचे अश्रू दिसत नाहीत. अशा नेतृत्वाच्या वृत्तीमुळे व कृतीमुळे कारखान्याची आर्थिक घडी बिघडली गेली आहे, त्यामुळे मागील वर्षातील ऊस उत्पादक
शेतकऱ्यांची कोटयावधी रुपयाची एफ.आर.पी.रक्कम देणे बाकी आहे. ज्या ठिकाणी सभासद व कामगार आपली स्वप्नपूर्ती होते आहे अशी भावना व्यक्त करीत त्याच ठिकाणी कारखाना बंद राहिल्यामुळे परिसर भकास वाटत आहे.

सध्याचे नेतृत्व खोटे बोलून शेतकरी सभासदांना फसविण्याचे काम करीत आहेत ते त्यांनी तात्काळ थांबवावे कारण सन २०१८-१९ च्या वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये नेतृत्वाने असेच खोटे बोलून सन २०१९-२० मध्ये
२१००० एकर उसाचे व त्यामधून ६ लाख ४५ हजार मेट्रिक टन उस गाळप करण्यासाठी मशीनरी दुरुस्तीचे व आवश्यक असणाऱ्या ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे नियोजन केले आहे असे अहवालाद्वारे स्वतः जाहीर करून सुद्धा कारखाना बंद ठेवला त्यामुळे चालू नेतृत्वावर ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचा काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. म्हणून येणाऱ्या पुढील वर्षी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चालू नेतृत्वाला केलेल्या पापाची फळे भोगावी लागणार आहेत विठ्ठल परिवाराच्या ऊस उत्पादक सभासदांनी व कामगारांनी घाबरून जाऊ नये. त्यांच्या आशीर्वादाने जर विठ्ठल पावला, तर आम्ही विठ्ठलचे प्रामाणिक स्वाभिमानी ऊस उत्पादक कै. औदुंबरअण्णा, कै. वसंतदादा व कै. यशवंतभाऊ यांच्या प्रमाणे विठ्ठल कारखान्यास गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व सभासदांना विश्वासात घेऊन कारखाना पूर्ण क्षमतेने बौद्धिक, सामाजिक व आर्थिक ताकद लावून निस्वार्थपणे चालविण्यास तयार आहोत व त्या माध्यमातून सभासद शेतकरी व कर्मचाऱ्याचे हित उत्तमप्रकारे जोपासू अशी ग्वाही देतो. आमची महाराष्ट्र शासनालाही विनंती आहे की, प्रशासक नेमावा ही विठ्ठलचे ऊस उत्पादक सभासद, कामगार, व्यापारी यांच्या वतीने विनंती आहे. श्री विठ्ठल चरणी आम्ही प्रार्थना करतो की, या नेतृत्वाला तात्काळ राजीनामा देण्याची सुबुद्धी  देवो व त्यांना राजीनामा देण्यासाठी बळ मिळावे म्हणून आम्ही येत्या ९ तारखेस तहसील कार्यालयाबाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करीत आहोत.’ पत्रकार परिषदेत शिक्षणतज्ञ डॉ. बी. पी. रोंगे यांच्या समवेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माऊली हळणवर, राजेंद्र
जगदाळे, पांडुरंगतात्या नाईकनवरे, काशिनाथ लवटे, नारायण मेटकरी, भाऊसाहेब घाडगे, अंकुश शेंबडे, दिलीप भोसले, पोपट पाटील आदी उपस्थित होते.

add