देशाच्या संरक्षण क्षेत्रात सेवेची संधी मिळणे अभिमानाची बाब होय – प्राचार्य डॉ. अशोक भोईटे - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 9 March 2020

देशाच्या संरक्षण क्षेत्रात सेवेची संधी मिळणे अभिमानाची बाब होय – प्राचार्य डॉ. अशोक भोईटे


पंढरपूर – “किडा मुंग्यासारखं जगून त्यांच्यासारखंच मरण्यापेक्षा देशासाठी कांहीतरी करुन मरण्याने जीवनाचे खऱ्या अर्थाने सोने होते. जगातील अनेक देशात संरक्षण क्षेत्रात काम करणे सक्तीचे असते. भारतात मात्र अशा स्वरुपाची कोणतीही सक्ती नसताना ग्रामीण भागातील अनेक तरुण संरक्षण क्षेत्रात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. यासाठी त्यांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे विशेष कौतुक केले पाहिजे. देशाच्या संरक्षण क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळणे. ही अतिशय अभिमानाची बाब असते. विद्यार्थ्यांनी या सेवेत सहभागी होवून देशाप्रती, मायभूमी प्रती अभिमान व्यक्त करावा.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची नुकतीच इंडियन आर्मीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अशोक भोईटे बोलत होते. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुभाषआबा सोनवणे, सरपंच दिलीप कोरके, डॉ. मंदार सोनवणे, मुन्नागीर गोसावी, दत्ता जगताप, बिस्कीटे सर, प्रा. डॉ. दत्ता डांगे, प्रा. डॉ. भारत सुळे, विजय पवार सर, विजय थिटे व कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या समारंभात सत्काराला उत्तर देताना समाधान पवार म्हणाला की, “आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी आहोत. आम्हाला शारीरिक कष्टाची सवय आहे. रोज आठ तास दुसऱ्याच्या शेतावर काम करण्याऐवजी रोज सातत्याने दोन तास परीक्षेचा सराव केला तर निश्चितच यश प्राप्त होते. यशासाठी नव्व्यानव टक्के प्रयत्न व एक टक्का नशिब जबाबदार असते. आमच्या यशात महाविद्यालयाने खूप मोठे सहकार्य केले. महाविद्यालयाचा ४०० मिटरचा ट्रॅक मैदानी प्रॅक्टीससाठी उपयुक्त ठरला. महाविद्यालयातील शिक्षकांचे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले. इतर सेवा सुविधा मिळाल्याने मला संरक्षण क्षेत्रातील भर्तीसाठी संधी मिळाली.” यावेळी मनोगत व्यक्त करताना अजय शेटे हा विद्यार्थी म्हणाला की, “महाविद्यालयाने भरतीपूर्व प्रशिक्षण हा कोर्स सुरु केल्याने या कोर्सचा आम्हाला खूप फायदा झाला. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना व स्पर्धा परीक्षा सेंटर यांचे खूपच मोलाचे मार्गदर्शन झाले. आम्ही पार्ट टाईम जॉब करुन शिक्षण घेत होतो. कॉलेजच्या शिक्षकांनी केलेल्या सहकार्याने व मार्गदर्शनाने आम्हाला खूप बळ मिळाले.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेनेचे विभाग प्रमुख डॉ. समाधान माने यांनी केले. या कार्यक्रमात रणजीत बाबर, सतिश शिंदे, सौरभ थोरात, धीरज गुंड, अभिजीत थिटे, मारुती पाटोळे, संतोष मेटकरी, समाधान पवार, विजय आणि अजय शेटे या भर्ती झालेल्या विद्यार्थ्यांचा फेटा व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. मधुकर जडल यांनी मानले.

add