ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे पुण्यात निधन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 17 March 2020

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे पुण्यात निधन


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे पुण्यात निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे त्यांचे गाव. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी पत्करली. जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

इयत्ता सातवीत असताना त्यांनी 'मोरूची मावशी' नाटकात मावशीची भूमिका साकारली.
कॉलेजमध्ये त्यांनी 'अंमलदार ' नाटकात 'हणम्या' साकारला. १९७० साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असल्याने नोकरीत अडचण येऊ लागली. त्यामुळे हातच्या नोकरीला रामराम ठोकावा लागला. आकाशवाणीत काम करत असताना अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली. याचाच फायदा चित्रपटात काम करताना उपयोगी पडला. दे दणादण, नवरी मिळे नवऱ्याला, झपाटलेला गंमत जंमत, बाळाचे बाप ब्रह्मचारी सारख्या चित्रपटात सरपंच, पाटील, पोलीस अधिकाऱ्यांच्या अशा विविधांगी भूमिका साकारल्या.

'खट्याळ सासू नाठाळ सून', 'माझा पती करोडपती', 'अशी ही बनवाबनवी', 'थरथराट', 'भुताचा भाऊ', 'दे दणादण', 'आयत्या घरात घरोबा', 'धुमधडाका', 'झपाटलेला' अशा अनेक मराठी चित्रपटांमधील जयराम कुलकर्णी यांनी भूमिका साकारल्या. या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.
सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे या गावी जयराम कुलकर्णी यांचा जन्म झाला होता. १९५६ मध्ये जयराम यांनी आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये नोकरी सुरू केली.

ते व्यंकटेश माडगूळकर यांचे सहायक म्हणून काम पाहत होते. जयराम कुलकर्णी यांच्यामागे पत्नी डॉ. हेमा कुलकर्णी, मुलगा रुचिर आणि सून मृणाल असा परिवार आहे.

add