एकदा माझी सटकली तर काही खरं नाही... निकृष्ठ दर्जाचे काम करणा-या ठेकेदारी संदर्भात कडाडले अजितदादा - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Tuesday, 10 March 2020

एकदा माझी सटकली तर काही खरं नाही... निकृष्ठ दर्जाचे काम करणा-या ठेकेदारी संदर्भात कडाडले अजितदादा

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-
"अधिकारी चिरीमिरी घेत असतील तर नाव सांगा बघतो त्यांच्याकडे... एका सर्कलची तक्रार आली होती, तेव्हा मी त्याला सांगेल नीट काम कर, एकदा माझी सटकली तर तुझे काही खरे नाही. रस्ता खराब झाला तर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू," असा इशारा निकृष्ठ दर्जाचे काम करणा-या ठेकेदारांना व भ्रष्ट अधिका-यांना देत उपमुख्यमंत्री अजितदादा यासंदर्भात चांगलेच कडाडले.

 उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहितला चांगल्या मताधिक्‍याने तुम्ही निवडून दिले. आता तुमचं काम संपलं, पूर्ण केलंय आता आमचं काम आहे. दिलेले शब्द निवडणुकीत दिलेले शब्द आम्ही पूर्ण करू. आयला प्रचारात यायचो, वाटायचं, हेलिकॉप्टरने यावं, रस्त्यांमुळे कंबर पार ढिल्ली व्हायची. कारण मतदारसंघातले रस्तेच तसे होते. आता रस्ते दर्जेदार होतील.चौंडी-राशीन-सिद्धटेक-श्रीक्षेत्र गोदड महाराज- संत श्री संत सीताराम बाबा या व इतर तीर्थस्थळासाठी भरीव आर्थिक तरतूद करू.

कर्जत तालुक्‍यातील माहिजळगाव येथे आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून सृजन महाराजस्व अभियानात कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील 36 गावांतील 42 हजार लाभार्थींना विविध योजनांचा लाभ प्रमाणपत्र वाटपप्रसंगी ते बोलत होते.

तुमच्याकडे पालकमंत्रिपद होतं मात्र त्याचा पाहिजे तेवढा फायदा झाला नाही. आता मात्र राज्यातला आदर्श मतदारसंघ निर्माण करण्याचे स्वप्न रोहितचे आहे. ते पूर्ण करण्यासाठी विकास आघाडी सरकार पाठीमागे खंबीर उभे राहू मात्र याकरिता आपल्या सर्वांचे सहकार्य आणि साथ लागेल. तो सारखा म्हणत असतो, काका हे करा, काका ते करा. तुम्हीपण सगळं विसरून कामाला लागलं पाहिजे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. सुधीर तांबे व लहू कानडे, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रवीण घुले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे, राजेंद्र कोठारी, जिल्हाधिकारी डॉ. राहुल द्विवेदी उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले रोहित पवार यांच्यावर आपण जबाबदारी टाकली त्यानुसार निवडून आल्यापासून त्यांनी काय केलं. आणि काय करणार आहोत, याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडला. रोहित हे पवार कुटुंबातील घटक आहेत. मात्र काम त्यांची काम करण्याची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रोहित पवार आहेत. येणाऱ्या पाच वर्षात कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील सर्व विकासाचा अनुशेष भरून निघेल.


आमदार रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील सर्व विभागांमध्ये महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये खर्डा मंडळ (ता. जामखेड) माहिजळगाव मंडळ (ता. कर्जत) व कर्जत शहर या या ठिकाणी शासनाच्या साठ प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा. यासाठी पहिल्या टप्प्यात आपण काम केले. यामुळे 42 हजारांपेक्षा अधिक लाभार्थी यातील सर्कलमधून मिळून आले.

पुढचा टप्पा पुढच्या दोन महिन्यांत आपण पूर्ण करणार आहोत. एकूण दोन्ही तालुक्‍यात मिळून दोन लाखापर्यंत लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. जामखेड शहराचा पाणीपुरवठा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून 107 कोटी रुपयांची योजना आपण मंजूर करून घेतली. कर्जतच्या डेपोचा प्रश्न मार्गी लावला आहे. कर्जत-जामखेड बसस्थानके मॉडेल करू. मतदारसंघातील स्थळे पर्यटनस्थळांसाठी निधी कमी पडून देणार नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केले.


add