Corona Virus- परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये कोणताही बदल नाही... ''कोरोना" प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 14 March 2020

Corona Virus- परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये कोणताही बदल नाही... ''कोरोना" प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी- विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

पुणे, दि. १४: ‘कोरोनाʼ च्या प्रतिबंधासाठी  पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करुन या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.


कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत कौन्सिल हॉल येथे डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विद्यापीठांचे कुलगुरु, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष तथा भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षण विभागाचे सहसंचालक मोहन खताळ, उपायुक्त प्रताप जाधव,   आदी मान्यवर उपस्थित होते.



सुटी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी घरामध्येच थांबावे
परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये कोणताही बदल नाही

पुणे,दि.14- पुण्यातील दहाही कोरोनाग्रस्तांची प्रकृती स्थिर असून जे रुग्ण संशयित आहेत, त्यांनी १४ दिवस कुठेही घराबाहेर पडू नये. घरीच थांबावे, ज्या विद्यार्थ्यांना सुटी मिळाली आहे,त्यांनी आपल्या घरामध्येच थांबावे.तसेच परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज दिली. तसेच नागरिकांनी आरोग्य देखभाली संदर्भात स्वयंशिस्त पाळावी असे आवाहनही त्यांनी केले.  
             जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात प्रशासनाच्या वतीने सुरु असलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.
           विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा नाहीत ,त्यांनी घराबाहेर फिरू नये. वयाने लहान असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी त्यांच्या पालकांनी घ्यायची आहे. त्याबाबत प्रशासनाकडून पालकांना सूचना देण्यात येणार असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. 
शासनाच्या आदेशाची प्रशासनाकडून अंमलबजावणी तत्परतेने करण्यात येत आहे. पुण्यात येणाऱ्या नागरिकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. 
   सॅनेटायझर्समध्ये भेसळ करणाऱ्या तिघांना काल अटक करण्यात आली आहे. या व्यक्ती भेसळ करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.त्यानंतर तातडीने ही कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले. 
          आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि आरोग्य देखभाली संदर्भात स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन करून डॉ. म्हैसेकर म्हणाले, राज्य शासनाने गर्दी टाळण्याच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये, तलाव, जीम, नाटयगृह, चित्रपटगृह, बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रशासनाकडून अंमलबजावणी सुरू आहे. कुलगुरू, कुलसचिव यांची बैठक घेत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने व खबरदारीसाठी आवश्यक असलेल्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात आहे. काल परदेशातून आलेल्या ११२नागरिकांची स्क्रीनिंग करण्यात आली असून यामध्ये कोरोनाबाधीत सात देशातून कोणताही नागरिक आला नाही. १५ फेब्रुवारीनंतर पुणे विमानतळावर उतरलेल्या सर्व प्रवाशांचा तपास सुरू आहे. संबंधित जिल्हा प्रशासनाकडून या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क केला जात असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

           जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही.  त्यांनी यात्रा, उत्सव, लग्न समारंभ असे गर्दीची ठिकाणे टाळावीत. सर्दी, खोकला, श्वसनाला त्रास अशी लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ उपचार घ्यावेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणू संदर्भात येणा-या संदेशाची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री १०४ क्रमांक करोना विषयक  शंका समाधानासाठी उपलब्ध  करण्यारत आला असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.          


      डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होवू नये, यासाठी प्रत्येकाने दक्षता बाळगणे गरजेचे आहे.  चीन, इराण, इटली, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या ७ देशांचा प्रवास करुन आलेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन (विलगीकरण) करावे. या विद्यार्थ्यांनी स्वतः हून घरीच १५ दिवस स्वतंत्र रहावे, कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये, अशा सूचना सर्वांपर्यंत पोहोचवा. परदेशातून आलेल्या व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण कक्ष स्थापन करावा, मात्र या कक्षातील विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. परदेशातून प्रवास करुन आलेल्या परंतु खासगी ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे प्रशासनाला सादर करावी, जेणेकरून त्यांची माहिती ठेवणे प्रशासनाला सोयीस्कर होईल, असे सांगून ते म्हणाले, विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता व सामाजिक शिष्टाचार राखण्याबाबत प्रशिक्षित करुन शैक्षणिक संस्था परिसरातही स्वच्छता राहिल, याची दक्षता बाळगा. विद्यार्थ्यांनी गर्दीत जाणे टाळावे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ औषधोपचार घ्यावा, सुटीच्या कालावधीत अनावश्यक बाहेर फिरु नये. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची लक्षणे आढळल्यास पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

      'कोरोना'च्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना, शैक्षणिक संस्थांनी करावयाचे प्रयत्न, विद्यार्थ्यांची सुरक्षा, पालकांनी घ्यावयाची खबरदारी आदी विषयी उपस्थितांनी शंका विचारल्या, त्यावर डॉ.म्हैसेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

add