कोरोनापेक्षाही लॉकडाऊन काळात जगायचं कसं? हा प्रश्‍न छळतोय सर्वसामान्यांना... - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 2 May 2020

कोरोनापेक्षाही लॉकडाऊन काळात जगायचं कसं? हा प्रश्‍न छळतोय सर्वसामान्यांना...


लॉकडाऊन वाढवा पण आधी गोरगरीबांच्या खात्यावर 
किमान 10 हजार जमा करा!- गणेश अंकुशराव
पंढरपूर (प्रतिनिधी):- सध्या संपुर्ण जगावर कोरोना नावाच्या एका विषाणूचे महाभयंकर संकट कोसळलेलं आहे. भारतातही या विषाणुनं थैमान घातलं आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर एकमेव ‘लॉकडाऊन’ हा पर्याय शासनानं जनतेसमोर ठेवलेला दिसुन येतो. परंतु सध्या सर्वसामान्यांना कोरोनापेक्षाही लॉकडाऊन काळात जगायचं कसं? हा प्रश्‍न छळतोय. येत्या 3 मे रोजी लॉकडाऊन कालावधी संपेल परंतु तो कालावधी रेड झोनमधील भागात पुन्हा वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्‍वभुमीवर आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने शासनाकडे एकच विनंती करतो की, ‘‘भलेही लॉकडाऊन वाढवा; पण त्याआधी गोरगरीब, मोलमजुरांच्या, निराधारांच्या खात्यावर किमान प्रत्येक 10 हजार रुपये भरा, ज्यांची खाती नाहीत अशांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ही रक्कम घरपोहोच करा.’’ अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे. आज चंद्रभागेच्या पात्रामध्ये गळाभर पाण्यात स्वत:ला बुडवून घेत त्यांनी ही मागणी केली आहे.

लॉकडाऊन काळात कोणत्याही गरीब कुटुंबाला अन्नपाण्याचा प्रश्‍न छळणार नाही यासाठी प्रशासनासह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय मंडळी घरपोहोच अन्नधान्य, भाजीपाला पोहोच करताना आढळुन आले. ही बाब निश्‍चितच समाधानकारक आहे, परंतु अशी मदत किती दिवस आणि कुणा-कुणाला होणार आहे? हाही प्रश्‍न आहेच. हाताला कामच नसल्याने अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला तसा अशांच्या दवापाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. गाठीशी पैसाच नसल्याने हातावरचे पोट असलेल्या अनेकांना घरात कोणी आजारी पडले तर दवाखान्याचा व औषधपाण्याचा खर्च कुठुन करायचा? हा प्रश्‍न सतावत आहे. आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून अशा सर्वच घटकांच्या मनातील अडीअडचणींचा पाढा भक्त पुंडलिकाच्या साक्षीनं चंद्रभागेच्या पाण्यात स्वत:ला बुडवुन घेत मी प्रशासनाला समजण्यासाठी वाचत आहे. असे मत गणेश अंकुशराव यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी उत्तम परचंडे, सुरज कांबळे, अप्पा करकमकर, वैभव माने आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.     

add