चिंताजनक... सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील दोन पोलीस कोरोना बाधीत - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Saturday, 2 May 2020

चिंताजनक... सोलापूर ग्रामीण मुख्यालयातील दोन पोलीस कोरोना बाधीत


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन असताना कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 210 पैकी तब्बल 180 मार्ग बंद करून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला आहे. 

दरम्यान, शनिवारी (ता. 2) ग्रामीण भागात बंदोबस्तासाठी असलेल्या व सोलापूर शहरातील पोलीस मुख्यालयात राहणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार शहर पोलिस मुख्यालयाच्या शेजारील ग्रामीण मुख्यालयाचा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.

 सोलापुर जिल्ह्यातील आढळून आलेल्या 111 रुग्णांपैकी  2 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सांगोला तालुक्यातील घेरडी तर मोहोळ तालुक्यातील पाटकुल याठिकाणी कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत.

उर्वरित तालुक्यांमध्ये अद्यापही कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही. परंतु, ग्रामीण मुख्यालयात राहणाऱ्या या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमका कुठे होता, त्यांना कोणत्या ठिकाणी, कोणाच्या संपर्कातून कोरोना झाला, याचा तपास आता युद्ध पातळीवर सुरु झाला आहे.

राज्यभरात सुमारे तीनशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून सोलापूर शहर जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी व अधिकारी कोरोना पासून चार हात लांब होते. मात्र, शनिवारी ग्रामीण मुख्यालयात राहणारे दोन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त दैनिक सकाळ च्या वेब पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

'ते' दोघेही राहत होते एकाच रूममध्ये
उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखली या गावचा रहिवासी असलेला एक पोलीस कर्मचारी सुट्ट्या संपवून काही दिवसांपूर्वी सोलापुरात ग्रामीण पोलीस दलात बंदोबस्तासाठी दाखल झाला. सोलापूर र् जिल्ह्यात येणारे बहुतांश रस्ते बंद केल्याने त्या पोलिस कर्मचाऱ्याला सांगोला, बार्शी अशा विविध ठिकाणी ड्युटी देण्यात आल्या होती. तो पोलीस कर्मचारी सोलापूर शहरातील ग्रामीण पोलीस मुख्यालयात राहण्यास होता. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला त्याचा एक पोलीस मित्र त्याच्या खोलीत राहत होता. एकाच्या संपर्कातून दुसऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. या दोघांच्या संपर्कातील तर उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेल्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कातील काही लोकांना आरोग्य विभागाने तपासणीसाठी ताब्यात असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, त्या दोघांपैकी नेमका सर्वप्रथम झाला कोणाला, याची माहिती पडताळण्यासाठी ट्रॅव्हल हिस्ट्री हा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.

add