संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे हडपसर येथे पुजन


Pandharpur Live Online-

वारकरी सांप्रदायाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. पंरपरेनुसार आज मंगळवारी (ता. १६) दोन्ही पालख्या हडपसरला विसाव्यासाठी येणार होत्या. मात्र ही पंरपरा खंडीत होऊ नये म्हणून हडपसरवासियांनी दोन्ही पालख्यांच्या विसावा स्थळी आरती करून ज्ञानेश्र्वरी व गाथेचे आणि पादुकांचे पूजन केले.


याप्रसंगी पालखी चोपदार रामभाऊ रंधवे, नगरसेविका वैशाली बनकर, मारूतीआबा तुपे, योगेश ससाणे, उज्वला जंगले, माजी नगरसेवक सुनिल बनकर, विजय देशमुख, योगेश गोंधळे, डॉ. शंतनू जगदाळे, सचिन पवार, विलास शिंदे, बाळासाहेब केमकर, सुभाष जंगले, प्रमोद रणवरे, अनिल शिंदे, बच्चूसिंग टाक, पोलिस निरिक्षक हमराज कुभांर उपस्थित होते.


Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

यावेळी गोंधळेनगर येथील विठ्ठल-रूक्मिणी भजनी मंडळ यांचे भजन झाले.


प्रत्येक वारकरी व भाविक ज्ञानोबा-तुकाराम या गजरासोबतच एक मागणी करत असेल ती म्हणजे हे कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि पुढच्या वर्षी तरी वारीची परंपरा उत्साहात आणि आनंदात साजरी होऊ देत. प्रत्येक हडपसरवासीय दरवर्षी दोन्ही पालख्यांचे मोठया उत्साहात स्वागत करण्यासाठी सज्ज असायचे. वारक-यांना भोजनासह विविध सेवा देण्यासाठी सज्ज असायचे. मात्र यंदा पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने हडपसर व परिसरातील लाखो नागरिक नाराज आहेत.


पालखी सोहळ्याचे चोपदार रामभाऊ रंधवे म्हणाले, आषाढातली पंढरपूरची वारी ही महाराष्ट्रातल्या सर्वांत मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते. पण यंदा कोरोना विषाणूची साथीमुळे पायी आषाढी वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वारकरी व भाविक नाराज झाले आहेत. मात्र टाळेबंदीमुळे व कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने दिलेले सर्व नियम पाळणे सर्वांना बंधनकारक आहे.