माऊलींच्या चल पादुका शिवशाही बसमधुन पंढरीकडे मार्गस्थ

पंढरपूर लाईव्ह- आज आषाढ शुद्ध दशमीला (ता. ३०) आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊलींच्या चल पादुका पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. पादुकांसोबत वीस लोकांची यादी आळंदी देवस्थानने तयार केली होती. दिंडीवाल्यासोबत एक पुजारी, एक चोपदार, मानकरी असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे यांनी दिली.


पंढरपूरला येताना माऊलींच्या पादुकांसोबत स्वतंत्र पोलिस बंदोबस्त आहे. एसटी बसने पादुका नेताना बसमध्ये जास्तीत जास्त वीस व्यक्तींना पादुकांसोबत नेण्याची परवानगी दिली आहे. 


पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, उर्जितसिंह शितोळ सरकार, बाळासाहेब चोपदार, रथापुढील दिंडी क्रमांक १ मधील ऋषिकेश वासकर, संभाजी बराटे, ज्ञानेश्वर दिघे, संजय कोलन, दिंडी क्रमांक दोनमधील अविनाश भोगाडे, दिडी क्रमांक तीनमधील ऋषिकेश मोरे, रथामागे दिंडी क्रमांक एकमधील चंद्रकांत तांबेकर खडकतकर, दिंडी क्रमांक दोनचे श्रीकांत टेंभूकर, दिंडी क्रमांक तीनचे भानुदास टेंभूकर, दोन आळंदीकर मानकरी, एक पुजारी, एक कर्णेकरी, एक शिपाई अशी वीस लोकांनासोबत माऊलींचा सोहळा शिवशाही एसटीने पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. 


दशमीच्या दिवशी आज पहाटे पाच वाजता पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांच्या हस्ते विधीवत पूजा पार पाडून, किर्तन सेवा पार पाडून नैवेद्य दाखवून, दुपारी १ वा. आकर्षक फुलांनी सजवलेल्या शिवनेरी बस ने अलंकापुरीतून पालखी सोहळा मार्गावरून पंढरपूरकडे विठू नामाच्या गजरात मार्गस्थ झाली, यावेळी सर्व २० जणांची कोरोणा टेस्ट करण्यात आली असून त्यांना संस्थान कमिटीने मास्क, फेसशील्ड, सेनीटाईज चे वाटप करण्यात आले आहे, मंदीर परिसरात यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 


खेड चे प्रांताधिकारी संजय तेली यांच्या देखरेखीखाली पालखी सोहळा पार पाडणार आहे ते स्वतः पालखी सोहळ्यासोबत असणार आहे पालखी सोहळा मार्गावर कोणत्याही ठिकाणी न थांबता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. यावेळी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आणि आळंदी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.