केश कर्तनालय, ब्युटी पार्लर सुरु होणार- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले परवानगी आदेश


Pandharpur Live - 

                 सोलापूर, दि.26:  सोलापूर जिल्हयात पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर चालू करण्यास उद्यापासून (दि.27) अटी शर्तींच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले. मात्र  प्रतिबंधीत सांसर्गिक क्षेत्रात (कंटेन्मेंट झोन) परवानगी देण्यात आलेली नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

आदेशात नमूद केलेल्या अटी पुढीलप्रमाणे –

 1)     हेअरकट, हेअरडाय, व्हॅक्सींग इत्यादींना परवानगी देण्यात येत आहे. तथापि दाढी, फेशियल, मसाज इत्यादी सेवा देण्यास परवानगी नाही. या सेवा दिल्या जाणार नाहीत, असा फलक दुकानाच्या बाह्य दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात यावा.

2)     केश कर्तनालयात काम करणाऱ्या चालक/कर्मचाऱ्यानी ग्लोव्हज, ॲप्रन आणि मास्कचा वापर करावा.

3)      प्रत्येकवेळी सेवा दिल्यानंतर खुर्च्या निर्जंतुक कराव्यात.

4)   दुकानातील वापरातील भाग आणि जमिनीचा पृष्ठभाग प्रत्येक दोन तासानी निर्जंतुक करावा.

5)     ग्राहकासाठी डिस्पोजेबल टॉवेल/नॅपकीनचा वापर करावा. नॉन डिस्पोजेबल साधने प्रत्येक वापरानंतर  निर्जंतुक आणि स्वच्छ करावीत.

6)     प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागात ग्राहकांसाठी माहितीबाबतच्या सूचना लावाव्यात.

 

     या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51,55तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 नुसार  कारवाईस पात्र असेल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.