आमदार परिचारकांना जमले ते महाराष्ट्र शासनाला का जमले नाही?- गणेश अंकुशराव


Pandharpur Live - ll
पंढरपूर (प्रतिनिधी):- महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर ‘‘आर्थिक अडचणीत सापडलेल्या गोरगरीबांना शासनाने किमान प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी.’’ अशी मागणी आम्ही चंद्रभागेच्या पाण्यात गळाभर पाण्यात उभारुन केली होती. याची दखल घेवून आमदार प्रशांतराव परिचारक यांनी तातडीने पंढरपूर अर्बन बँकेकडून विनातारण व अल्प व्याजदरात प्रत्येक गोरगरीब, छोट्या व्यावसायिकाला 10 हजार रुपयांचे कर्ज मंजुर केले. याबद्दल आ. परिचारक यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत; परंतु जे आमदार परिचारकांना जमले ते महाराष्ट्र शासनाला का जमले नाही? असा खडा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी जारी केलेल्या एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासुन लॉकडाऊन सुरु आहे. या काळात हातावरचे पोट असलेल्या कित्येक कुटुंबांची उपासमार सुरु आहे. या काळात पंढरपूरच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रभरात जिथे जिथे कार्यक्षेत्र आहे त्या राज्याच्या सर्व भागातील कष्टकरी-छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना पंढरपूर अर्बन बँकेमार्फत विनातारण तातडीचे कर्ज आ. प्रशांतराव परिचारक यांनी उपलब्ध करुन दिले. परंतु अशा गोरगरीब, कष्टकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाने मात्र या महाभयंकर संकटात वार्‍यावर सोडल्याचे दिसुन येते. पंढरीत अनेक कुटुंब असे आहेत की, ज्यांचा उदरनिर्वाह हा पंढरीतील यात्राकाळात मिळणार्‍या उत्पन्नावर चालतो. परंतु कधी नव्हे ती पंढरीची आषाढी वारी सुध्दा कोरोनाच्या संकटमुळे रद्द झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत सत्ताधारी पार्टीचे स्थानिक आमदार मात्र राजकीय कुरघोड्या खेळण्यात आणि नेहमीप्रमाणे बढाया मारण्यात व जनतेला भावनिक राजकारणात गुंतवण्यात मग्न आहेत. हे निश्‍चितच तमाम पंढरपूरकरांसाठी खेदजनक आहे.

आमदार प्रशांतराव परिचारक यांनीकाळाचे गांभीर्य ओळखुन कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या माध्यमातुन  मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी गोरगरीबांची होणारी आबाळ पाहुन पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातुन हातगाडीवाले व किरकोळ व्यावसायिकांना तातडीने कर्ज मिळवुन दिल्यामुळे पंढरीतील व महाराष्ट्रातील गोरगरीबांना कोरोनाच्या संकटातुन पुन्हा उभा राहण्यासाठी नवी उभारी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनानेही अशीच भरीव आर्थिक मदत देणे अत्यावश्यक आहे. पंढरपूर-मंगळवेेढा विधानसभा मतदार संघाच्या आमदारांनी राज्यात त्यांचेच सरकार असल्यामुळे ही बाब शासनाला कळवावी. अशी अपेक्षाही गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केली आहे.