खळबळजनक- पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे पलायन


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

याबाबत पंढरपूर लाईव्ह ला समजलेल्या माहितीनुसार शिवाजी नाथा भोसले (वय अंदाजे 50) (रा.तिसंगी, ता.पंढरपूर) येथील आरोपीस स्वतःच्या पत्नीच्या खुनाच्या गुन्हयाखाली अटक करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी सदर आरोपीने आपल्या पत्नीचा कोयत्याने गळा चिरून खुन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.  सदर आरोपी हा पंढरपूर सबजेलमध्ये कैदेत होता. परंतु काल रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सदर आरोपीच्या छातीत दुखू लागल्याने त्यास पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान उपचार सुरू असतानाच आरोपी पोलिसांची नजर चुकवून आज पहाटेच्या सुमारास रूग्णालयाच्या शौचालयातील खिडकीतून  पळून गेल्याचे समजते.  सध्या पोलीस सदर आरोपीचा सर्वत्र कसून शोध घेत आहेत.

यासंदर्भात पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण पवार यांचेशी पंढरपूर लाईव्ह ने संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली.