लॉकडाऊन काळातही पुण्यात वाढल्या गुन्हेगारांच्या हालचाली... मुंबईतील पुरुष आणि महिलेला पुण्यात ड्रग्ज विकताना अटक


Pandharpur Live Online- 
पुणे-
पुण्यात लॉकडाऊनच्या काळातही गुन्हेगारांच्या हालचालीत वाढ झालेली दिसुन येत असुन नशेबाजांची तल्लफ भागविण्यासाठी आणि आपले उखळ पांढरे करुन घेण्यासाठी मुंबई येथून एक महिला आणि पुरुष ड्रग्ज घेवून पुण्यात आले होते. परंतु ड्रग्ज विकताना या दोघांनाही पुण्यात रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. 

पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सर्वत्र ग्राहकांची गर्दी दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात अंमली पदार्थ खरेदी आणि विक्रीसाठी नशेबाज उतावीळ झाल्याचं दिसत आहे.
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019


पुण्यात एमडी ड्रग्ज विकताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आलं. नवी मुंबईतील 43 वर्षीय विवेक लुल्ला आणि 30 वर्षीय हेमा सिंग यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे. दोघांकडे 65 ग्रॅम 450 मिलीग्राम एमडी अमली पदार्थ आढळून आला आहे. या कारवाईत तब्बल 3 लाख 31 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बाणेर परिसरातील नॅशनल इन्शुरन्स अकॅडमीच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. नवी मुंबईतून दोघे जण पुण्यात अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतलं.

या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा पुढील तपास सुरु आहे. हे ड्रग कुठून आणलं होतं आणि कोणाला विकण्यात येणार होतं. या ग्राहकांचाही तपास करण्यात येणार आहे. त्यामुळे अंमली पदार्थाचं उत्पादन, विक्री आणि खरेदी करणार्‍या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनच्या काळात याआधीही पुण्यात अंमली पदार्थ पकडण्यात आले आहेत. आलिशान कार आणि शहाळ्याच्या टेम्पोमधून 120 किलो गांजाची तस्करी होत असल्याचं उघड झालं होतं. विशाखापट्टणमहून मुंबईत गांजाची वाहतूक करणार्‍या टोळीवर पुण्यात पोलिसांनी धडक कारवाई केली होती.

लॉकडाऊनमध्ये पुण्यात गुन्हेगारी वाढली...


                               पुण्यात लॉकडाऊनमध्ये अनेक गुन्हे घडत असल्याचं समोर आलं आहे. मृत मनपा कर्मचार्‍याचा ड्रेस घालून दोन तरुण गांजा आणायला गेल्याचं उघड झाल्यानंतर अवैध गुटखा पकडला होता. धक्कदायक म्हणजे तो आरोपी चक्क पुणे पोलिसातील हवालदार असल्याचं समोर आलं होतं.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी नाकाबंदीदरम्यान, बेकायदेशीर गुटखा घेऊन पळून जात असलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडलं होतं. हे आरोपी पळून जात होते, त्यावेळी त्यांना नारायणगाव पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केले होते.


                                   पुण्यात हुक्क्याची होम डिलिव्हरी होत असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. हुक्का विक्रीसाठी घेऊन आलेल्या तिघांना गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडलं होतं. गांजा, गुटखा, हुक्क्याच्या विक्रीचा प्रकार आतापर्यंत पुण्यात समोर आला आहे. ’व्हॉट्स हॉट’ या संकेतस्थळावर मोबाईल संपर्क देऊन हुक्क्याची जाहिरात करण्यात आली. संकेतस्थळावर संपर्क करणार्‍या व्यक्तीला हुक्क्याची घरपोच डिलिव्हरी केली जात होती.


                       पुण्यात एका पठ्ठ्याने अनोखी शक्कल लढवली होती. महापालिकेच्या मृत कर्मचार्‍याचा ड्रेस घालून हा पठ्ठ्या चक्क गांजा आणण्यासाठी गेला होता. पोलिसांनी संशयावरुन पकडल्यानंतर या ’चरसी’चं बिंग फुटलं. पुणे पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली होती.