कोरोनाला रोखण्यासाठी स्वेरीने केली ‘डिस्टन्स अलर्ट डिवाइस’ची निर्मिती


पंढरपूर- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर सर्वत्र कोरोनाला थोपवण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. असे प्रयत्न करत असतानाच नागरिकांमध्ये मात्र सुरक्षित अंतर पाळले जात नसल्याचे चित्र दिसून येते. केवळ सुरक्षित अंतर न ठेवल्याच्या कारणामुळे अनेकजण एकमेकांच्या संपर्कात येऊन कोरोनाला बळी पडत आहेत. हे रोखण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

         याच पार्श्वभूमीवर गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इन्स्टीट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राध्यापकांनी एक नवीन यंत्र शोधून काढले आहे. या यंत्रामुळे समोरील व्यक्ती पासून आपण सुरक्षित अंतर ठेवू शकतो. सुरक्षित अंतराच्या मर्यादेमध्ये आल्यास त्या यंत्राचे लाल लाईट प्रकाशमान होवून एक प्रकारे सावध राहण्याची सूचना करते. या यंत्रामुळे  व्यक्ती मर्यादेच्या आत येत नाहीत आणि सुरक्षित अंतर ठेवण्यात मदत होते. समोरील व्यक्तीस मर्यादीत अंतरावर  ठेवण्यासाठी या यंत्राला डीस्टन्स सेटिंग करता येते. हे यंत्र जर प्रत्येकाकडे असेल तर त्यावरील बझरचा आवाज ऐकून समोरचा नागरिक काही ठराविक अंतर दूर राहून संभाषण करू शकतो आणि साहजिकच कोरोना महामारी पासून बचाव करू शकतो. 

हे यंत्र स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे प्रा.आशिष जाधव, प्रा रेश्मा देशमुख व मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे प्रा. अविनाश पारखे यांनी बनवले आहे. या यंत्राचे नाव ‘डिस्टन्स अलर्ट डिवाइस’ असे असून याचा आकार लहान असल्यामुळे ते आपण  सहज खिशामध्ये ठेवू शकतो. या यंत्रांमध्ये वापर केलेल्या ‘अल्ट्रासोनिक सेंसर एचसी-एसआर०४’ च्या सहाय्याने आपले व समोरील व्यक्ती यामधील अंतर मोजण्यात येते. या अंतराचा डिजीटल डेटा मायक्रोकंट्रोलरच्या सहाय्याने व्हेरिफाय केला जातो. जर हे अंतर एक मीटर पेक्षा कमी असेल तर त्यामध्ये असलेला स्वयंचलित मायक्रोकंट्रोलर हा अलर्ट बझर आणि त्याच बरोबर एलईडी इंडिकेशन देतो. ज्यामुळे हे यंत्र ज्या व्यक्तीने धारण केले आहे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीपासून दूर रहाण्यासाठी एक प्रकारे सूचना मिळते. या डिवाइसचे उत्पादन पूर्णतः स्वेरी मध्ये करण्यात आले असून स्वेरीतील थ्रीडी प्रिंटिंग फॅसिलिटी, लेझर कटिंग मशीन्स आणि आणि मायक्रो प्रोसेसर प्रोग्रामिंग लॅब चा उपयोग या डिस्टन्स अलर्ट डिवाइसच्या निर्मितीमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी देखील स्वेरीने अनेक शोध लावले असून आता त्यात या यंत्राची भर पडली असून सध्याच्या काळात या यंत्राची खूप आवश्यकता आहे असे दिसून येते.