परीक्षा रद्दच... शाळा सुध्दा लगेच सुरू होणार नाहीत- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-

अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत यासंदर्भात राज्यपालांनी सुध्दा मला कळवले आहे. शाळाही आता सुरु होणार नाहीत. अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा होऊ शकते. मुंबईच्या रस्त्यावर वडापाव लवकरच मिळेल', असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राच्या मुलाखतीत सांगितले. सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यातील कोरोना स्थिती आणि विरोधकांवर आपले मत मांडले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत याबाबत राज्यपालांनीही मला कळवले आहे.

शाळाही आता सुरु होणार नाहीत. अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा होऊ शकते. शाळा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु होणार असे विचारा. मी निर्णय घेताना टीकेची पर्वा करत नाही, बरोबर वाटेल ते करतोच, परीक्षा व्हावी असे मलाही वाटते, पण परिस्थिती तशी नाही. तिस-या वर्षांच्या मुलांना सरासरी मार्क देऊन अडथळे दूर केले आहेत. सरासरी मार्क नको असलेल्यांना परीक्षेचाही पर्याय उपलब्ध आहे.'

'मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव लवकरच मिळेल. WHO ने धारावीचं उदाहरण साऱ्या जगाला दिले आहे. वॉशिंग्टन पोस्टनेही मुंबईत लपवाछपवी नाही असं म्हंटलं आहे. विरोधक काय म्हणतायत त्याकडे लक्ष देत नाही. देवच म्हणतोय मी तुमच्यातच आहे, मंदिरात येऊ नका. लॉकडाऊन आहेच, एकेक गोष्टी सोडवत आहे', असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

'घाईघाईन लॉकडाऊन लावणे आणि उठवणे चूक ठरु शकते. घिसाडघाईनं लॉकडाऊन उठवले न् साथ पसरली तर जीव जातील. 'जीव गेला तरी बेहत्तर लॉकडाऊन उठवा' याची आहे का तयारी ? मी म्हणजे ट्रम्प नाही, डोळ्यासमोर माझी माणसे तडफडू देणार नाही. लॉकडाऊनच्या विरोधकांनी एकदा काय ते ठरवावे. लॉकडाऊन उठवले तर घरंच्या घरं रिकामी होऊन टाळे लागतील. अख्खे कुटुंबच मरण पावले तर घराचे टाळे कोण उघडणार ?', असा प्रश्नही यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

'लसीचे प्रयोग सुरु झालेत, काही महिन्यात लस येईल म्हणत आहेत. डिसेंबर अखेर देशात लस उपलब्ध होईल असं सध्या चित्र आहे', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'दूध उत्पादकच काय, कुणाच्याच मालाला भाव मिळेना, सगळेच लोक अन्याय होतोय म्हणत असतील तर ते योग्य नाही. केंद्राची 38 हजार कोटींची मदत हळूहळू येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारचेही उत्पन्न घटलेले आहे. महसूल वाढवायचा तर कोणाकडून वसूल करावा सांगा ? सध्या तरी 'पी हळद अन् हो गोरी' असा उपाय नाही', असंही उद्धव ठाकरे म्हणाले.