निर्भीड संपादक, आक्रमक राजकीय नेतृत्व काळाच्या पडद्याआड.... भाजपा शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे कोरोनामुळे दु:खद निधन


पंढरपूर शहरातील एक आक्रमक आणि उभरतं राजकीय नेतृत्व, निर्भीड, सडेतोड पत्रकारिता करणारे दैनिक निर्भीड आपलं मत चे मुख्य संपादक संजय वाईकर (वय-52) यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले.

मागील 10 दिवसांपूर्वी श्री. वाईकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर वाखरी येथील कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू केले होते.  परंतु अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोलापूर मध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. 

संजय वाईकर यांच्या पश्चात पत्नी आणि 1 मुलगी असा परिवार आहे.  त्यांच्या पार्थिवावर सोलापूर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. 

संजय वाईकर यांनी दै. प्रभात च्या माध्यमातून आपल्या पत्रकारितेचा प्रारंभ केला. यानंतर त्यांनी सा. आपलं मत चे संपादक म्हणून कार्य केले. सा.आपलं मत च्या माध्यमातून त्यांनी एक लढवय्या, निर्भीडपणे मत मांडणारा संपादक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. यानंतर त्यांनी निर्भीड आपलं मत हे सायं दैनिक सुरू केले. दैनिक निर्भीड आपलं मत ला आज कोणती हेडलाईन असेल? विशेष संपादकीय कोणत्या विषयावर असेल? याची उत्सुकता सामान्य पंढरपूरकरांना लागुन असायची. इतपत त्यांनी या दैनिकाची लोकप्रियता वाढवलेली होती. अनेक अडीअडचणींवर मात करून त्यांनी दैनिक निर्भीड आपलं मत यशस्वीपणे चालवून दाखवले. पंढरीच्या  पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटविला.

यानंतर त्यांनी मागील 3 वर्षांपूर्वी भाजपाचे शहराध्यक्षपद स्वीकारले. भाजपामध्ये त्यांनी अनेक नवीन चेह-यांना काम करण्याची संधी दिली. राजकारणात उतरल्यानंतरही त्यांनी आपली आक्रमक शैली, सडेतोडपणा कायम ठेवला. अल्पावधीतच या क्षेत्रातही त्यांनी आपली स्वतंत्र छाप निर्माण केली होती.

अतिशय शून्यातून जग निर्माण करणारं, स्वतःचं वेगळं  अस्तित्व निर्माण करणारं संजय वाईकर नावाचं वादळ आज असं अचानक शांत झालं यावर विश्वासच बसत नाही. परंतु नियती कधी कधी क्रूर खेळ खेळते हे कटुसत्य आहे. पंढरपूर लाईव्ह कडून त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारास या दुःखातुन  सावरण्याचं बळ देवो. हीच श्रीविठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना.
- संपादक पंढरपूर लाईव्ह