प्रांताधिकारी सचिन ढोले यांचा अवैध वाळु चोरीवर कारवाईचा धडाका सुरुच!


 
सध्या पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पंढरपूर तालुक्यात अवैैधरित्या वाळु उपसा करणार्‍यावर कारवाई करण्याचा धडाका सुरु केला आहे. तालुक्यातील व्होळे येथील नदीकाठावर धाड टाकुन 70 ब्रास पकडल्यानंतर आज त्यांनी आंबे येथे वाळु ठेकेदारांना सहकार्य करणार्‍या 8 शेतकर्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पंढरपूर तालुक्याच्या भीमाकाठच्या कांही गावात अवैधरित्या वाळु उपसा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे; परंतु प्रशासनातीलच कांहीजणांच्या सहकार्याने हे सगळे बिनबोभाट चालते, सदर वाळु उपशासंदर्भात ग्रामस्थांना, लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला माहिती असुनही याविरुध्द कडक कारवाई होत नसल्याने   वाळु चोरट्यांचे फावत आहे.

 
वर्षानुवर्षे अवैधरित्या वाळु उपसा होत असुनही संबंधित वाळु चोरट्यांवर मोठी कारवाई केली जात नाही. यामुळे यांचे सर्वकांही अलबेल चाललेले  असते. परंतु पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी वाळु चोरट्यांवर व त्यांना सहकार्य करण्यांवर कारवाईचा बडगा उचलल्याने नदीकाठच्या अनेक गावातुन समाधान व्यक्त होत आहे. प्रांताधिकारी श्री.ढोले यांनी स्वत:च  अशी कारवाई इतरही ठिकाणी सातत्याने करावी. अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. 


 वाळु तस्करीला प्रोत्साहन देणारांविरुध्दही यापुढे कारवाई करण्यात येणार असल्याचे आज प्रांताधिकारी श्री.ढोले यांनी स्पष्ट केले. आज आंबे (ता. पंढरपूर) येथील विठ्ठल यशवंत गायकवाड, प्रेम गायकवाड, हरी शिंदे, आबासाहेब इंगवले, पारुबाई शिंदे, सरदार कोळी, बळीराम शिंदे, संतोष नागणे, लक्ष्मण नागणे, आदी शेतकर्‍यांना अवैधरित्या वाळु चोरणार्‍यांना सहकार्य करत असल्याचा ठपका ठेवुन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रांताधिकार्‍यांच्या कारवाईच्या या धडाक्यामुळे वाळु चोरट्यांचे धाबे दणाणले असुन सर्वसामान्यातुन श्री.ढोले यांचे कौतुक होत आहे.