मंगळवेढा येथील ह.भ.प. तात्यासाहेब बुवा जगताप यांचे निधन.... त्यांच्या जीवनावर टाकलेला एक दृष्टिक्षेप


मंगळवेढा येथील ह. भ. प. तात्यासाहेब उर्फ बुवा दशरथ जगताप यांचे दि. 14 जुलै रोजी निधन झाले. सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे यांचे ते सहकारी मित्र होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जोपासली. माणुसकी चे नाते शेवटपर्यंत जोपासलेल्या या महानुभुतींच्या जीवनावर टाकलेला एक दृष्टिक्षेप....

    हरती दुःखितांचा भवताप,

     करती कामे गोर गरिबांची,
     छाया वेताळ हनुमंताची.

अनेकांनी श्री तात्यासाहेब उर्फ बुवा दशरथ जगताप मंगळवेढा हे नाव अगदी बालपणापासून ऐकलेलं असणारच. पूर्वी कॅसेट नसल्याने HMV च्या डिस्क असायच्या. आम्हाला प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्याशिवाय माहिती नव्हती. कार्यक्रम कोणताही असो गाणी एकच. 'मंगळवेढे भूमी संतांची ' या हरेंद्र जाधव यांनी लिहिलेल्या आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या गाण्यात बुवा जगताप यांचा उल्लेख आहे. बुवा जगताप आणि प्रल्हाद शिंदे हे अगदी जीवलग मित्र. त्यांच्या आग्रहास्तव मंगळवेढ्यावर हे गाणं लिहिलं गेलं, तेही एका दिवसात. त्यासाठी हरेंद्र जाधव मंगळवेढ्याला आले होते. हरेंद्र जाधव हे आता थकलेले आहेत त्यांची कन्या छाया जाधव यांना बुवा जगताप यांचे मुलाखतीसाठी विनंति केलेली होती, त्यांनी बुवांसोबत गप्पा मारल्या,यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पूर्वी सर्व त्यांना घाबरायचे. पांढरी दाढी, पांढरे धोतर,पांढरा शुभ्र सदरा आणि काठी असा त्यांचा पेहराव.आजपर्यंत चालणेही अगदी कडक. हातात काठी आली तरी त्यात बदल झाला नाही. मंगळवेढ्यात इंग्लिश स्कुल या शाळेसमोर त्यांचं बाळकृष्ण हॉटेल होते. त्याच्या गल्ल्यावर ते बसलेले असत.
 हॉटेलमध्ये त्यांचा भारदस्त फोटो होता. चेष्टा करायची त्यांना भारी सवय. आलेल्या गिऱ्हाईकासोबत अगदी ख्याली खुशालीसह बोलताना दिसायचे.शासकीय कर्मचारी यांची ओळख असणारच.ग्रामीण भागातून आलेल्या शालेय मुलांना सायंकाळी जेवताना भाजी किंवा दूध नसायचं. बुवा त्यांना आवर्जून देत.
 ते कार्य अजूनही त्यांची मुले जोपासत आहेत. एखाद्याकडे नाश्त्याचे पैसे नसले तरी त्यांनी कधी माघारी जावू दिलं नाही. बुवांनी अनेकांना नोकरी व लघुधंद्यासाठी मदत केली.

राज्य परिवाहन मंडळ कर्मचारी आणि लहान मुले यांच्या चहा किंवा दुधाचे पैसे कधीही घेतलेले नाहीत,त्यांना राजकीय सहवास होता.

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब यांना भेटण्यासाठी मंगळवेढा येथे नेते गेले,तर बुवाची तबेत कशी आहे?असा प्रश्न साहेब विचारतात.
किर्तनाचे त्यांना भारी वेड. आपल्या मुलीनं किर्तन करावे ही त्यांची ईच्छा. त्यासाठी ते दामाजी मंदिरात घेवून जायचे. अखेर त्यांनी मुलीला किर्तनकार केले.मुंबई येथे दूरदर्शनवर रेकॉर्डिंग झाले, ही खरोखर वेगळी गोष्ट होती.

 त्यांच्या मित्रत्वामुळे प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं गाणं महाराष्ट्रात गाजलं सोबत बुवांचं नाव ही गाजलं. दि. 14 जुलै 2020 रोजी बुवांचं सकाळी 6.वाजता निधन झालं....
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज त्यांचं हे गाणं सर्वांना नक्कीच आठवत असणार.
   
शिकवण देई सत्यधर्माची,
      परंपरा ही कैक वर्षांची,
      गौरवशाली महाराष्ट्राची,
      मंगळवेढे भूमी संतांची.

  त्यांचे पश्चात तीन मुले,तीन मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे. बाळकृष्ण हॉटेल चे मालक बाळकृष्ण,विष्णू आणि पांडुरंग जगताप यांचे ते वडील होत.मंगळवेढा न पा पक्षनेता अजित जगताप यांचे आजोबा होत आणि माझे ते मामा आणि सासरे होत.
       - श्री सोपान चव्हाण सर